सातारा : गणपतीमाळावर बिबट्या, दोन बछड्यांचा वावर

बिबट्या आणि बछडे  www.pudhari.news
बिबट्या आणि बछडे www.pudhari.news

सायगाव; सुहास भोसले : जावली तालुक्यातील गणपतीमाळ, महिगावचा डोंगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मादी बिबट्या व दोन बछड्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून काही नागरिकांना या बिबट्याचे दर्शनही झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून सतर्कता बाळगण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

गणपतीचामाळ हा परिसर डोंगरी असल्यामुळे या भागात दाट झाडी आहे. गेल्या काही दिवसांपासून गणपती मंदिर ते महिगाव यादरम्यान काही नागरिकांना मादी बिबट्या व दोन बछडे निदर्शनास आले. याबाबतची माहिती वनविभागाला नागरिकांनी दिली असून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी या परिसरात येवून उपाययोजना राबवण्याच्या अनुषंगाने पाहणीही केली आहे. मात्र त्यानंतर अद्याप तरी काही कार्यवाही झाली नसल्याचे चित्र आहे.
गणपती माळ परिसरात दाट झाडी असून नागरिकांची वर्दळही तुलनेने कमी प्रमाणात असते. शेतकरी शेतीच्या कामासाठी या परिसरात वावरत असतात. या बिबट्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

तालुक्यात यापुर्वीही बिबट्याचा वावर अनेकदा दिसून आला आहे. बेसुमार वृक्षतोड, भक्ष्य व पाण्याचा अभाव यामुळे वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे गणपतीमाळ परिसरातील गावांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. मिळेल त्या परिस्थितीत मिळेत ती शिकार करण्याचं कसब अंगी भिनलेले बिबटे जंगले नष्ट झाल्याने मोठ्या प्रमाणत विस्थापित होत आहेत. पोटाची भूक शमवण्यासाठी पारंपरिक शिकार मिळत नसल्याने ते साहजिकच मानवी वस्त्यांकडे आकर्षिले जात आहेत. सध्या अशाच बिबट्यांनी गणपती माळ, महिगावचा पश्चिमेकडील भाग या डोंगर परिसरात तसेच ऊसाच्या रानात शिरकाव केला आहे. अनेकदा हे बिबटे पारंपरिक शिकार मिळत नसल्याने पाळीव प्राण्यावर व माणसांवरही हल्ले करत असतात. त्यामुळे नवविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

        बिबट्यापासून घ्या काळजी

  •  शेतकर्‍यांनी पाळीव जनावरे शक्यतो बंदिस्त गोठ्यात ठेवावीत.
  •   सायंकाळी 6 ते 9 व पहाटे 5 ते 7 या वेळेत बिबटे शिकारीसाठी तयार असल्याचे अभ्यासाअंती पुढे आले आहे. शक्यतो या वेळेत लहान मुले, स्त्रिया व एकट्याने बाहेर पडणे टाळावे.
  • ज्या भागात बिबट्यांचा वावर वाढतो त्या ठिकाणी नागरिकांनी आपली दैनंदिन कामे करतांना अधिक जागरूक राहण्याची गरज आहे.
  •   बिबट्या शक्यतो उभ्या व्यक्तीवर हल्ला करत नाही. खाली बसलेली, वाकलेली व्यक्ती म्हणजेच त्याच्या नजरेच्या टप्प्यातील आकृती यास तो सावज समजून हल्ला करू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत वाकणे, खाली बसने टाळा.
  •  उसाच्या शेतात बसल्याजागी बिबट्यांना लपण्याची व पिण्याच्या पाण्याची सोय होत असल्याने ऊस लागवड क्षेत्रात हमखास बिबट्याचा वावर वाढत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news