सातारा : खासदार श्रीनिवास पाटील यांना जीवनगौरव यशवंत पुरस्कार

सातारा : खासदार श्रीनिवास पाटील यांना जीवनगौरव यशवंत पुरस्कार
Published on
Updated on

कराड; पुढारी वृत्तसेवा : विजय दिवस समारोह समितीतर्फे दिला जाणारा यंदाचा जीवनगौरव यशवंत पुरस्कार माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांना जाहीर झाला आहे. त्याच कार्यक्रमात ब्रिगेडियर जेम्स थॉमस, सातार्‍याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. 15 डिसेंबरला मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल, अशी माहिती विजय दिवस समारोह समितीचे सचिव अ‍ॅड. संभाजीराव मोहिते यांनी दिली.

कराड येथे ते पत्रकारांशी बोलत होते. समितीचे विनायक विभुते, सहसचीव विलासराव जाधव उपस्थित होते. अ‍ॅड. संभाजीराव मोहिते म्हणाले, कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा रौप्यमहोत्सव विजय दिवस साजरा होत आहे. विजय दिवस समीतीतर्फे दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना जीवन गौरव यशवंत पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.

आतापर्यंत ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील, संभाजीबाबा थोरात, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, सहकारमहर्षी जयवंतराव भोसले, नागनाथआण्णा नायकवडी, आचार्य शांताराम गरुड, भाई संपतराव पवार, अशोक गोडसे, क्रिकेटर चंदु बोर्डे, उद्योजक बाबासाहेब कल्याणी, भारती विद्यापीठाचे डॉ. शिवाजरीव कदम, जयसिंगराव पाटील-उंडाळकर, कृषितज्ज्ञ सदुभाऊ पाटील यांच्यासह मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहेत.

यंदाचा पुरस्कार माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांना जाहीर झाला आहे. 15 डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे पुरस्काराचे वितरण आणि ब्रिगेडीयर जेम्स थॉमस व पोलिस अधिक्षक समीर शेख यांचा विषेश पुरस्काराने सन्मान होईल. याच कार्यक्रमात वीर माता श्रीमती यशोदाबाई चव्हाण (तळबीड), आदर्श माता बाळुताई ढेबे (कापील), आदर्श विद्यार्थीनी अमृता पाटील (कराड) तर आदर्श विद्यार्थी सोहेल मुलाणी (कराड) यांनाही गौरवण्यात येईल. या कार्यक्रमास माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नु, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे उपस्थित राहणार आहेत.

गौरव ग्रंथाचे होणार प्रकाशन…

15 डिसेंबरला होणार्‍या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ज्यांच्यामुळे कराडमध्ये विजय दिवस साजरा होत आहे, ते विजय दिवस समारोहचे अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील यांच्या जीवन कार्यावर आधारित ग्रंथाचे प्रकाशन होईल. त्यास माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नु, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे व मान्यवर उपस्थित राहतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news