सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात केवळ खंडाळा तालुक्याचे दोन्ही डोसचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहेत. तर सातारा आणि महाबळेश्वर तालुक्यात सर्वांनी पहिला डोस घेतला आहे. मात्र, लसीकरणाच्या दीड वर्षानंतरही इतर तालुक्यात लस घेण्याबाबत उदासिनता दिसत असल्याने पहिला डोसही पूर्ण झालेला नाही. आतापर्यंत 24 लाख 15 हजार 333 नागरिकांनी पहिला डोस तर दुसरा डोस 20 लाख 12 हजार 959 नागरिकांनी घेतला आहे.
जिल्ह्यात जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरणाला आरोग्य विभागाकडून सुरुवात करण्यात आली. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर 60 वर्षांवरील ज्येष्ठ आणि 45 ते 59 वर्षांतील कोमॉर्बिड नागरिकांना लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली. दुसर्या टप्प्यात 45 वर्षांवरील सर्वांनाच लस मिळू लागली. तर गेल्यावर्षी एक मे पासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर यावर्षी जानेवारीपासून 15 वर्षांपुढील आणि त्यानंतर काही दिवसांतच 12 वर्षांवरील सर्वांनाच लस देण्यास सुरुवात झाली.
जिल्ह्यात 12 वर्षांपुढील 25 लाख 28 हजार 369 नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. या नागरिकांना लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सातारा, खंडाळा आणि महाबळेश्वर हे तीन तालुकेच लसीकरणात आघाडीवर राहिले आहेत. या तालुक्यांत लसीचा पहिला डोस 100 टक्के पूर्ण झाला आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत खंडाळा तालुक्यात दोन्ही डोस 100 टक्के पूर्ण झालेले आहेत. या तालुक्यात 1 लाख 5 हजार 561 नागरिकांना लसीकरणाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात पहिला डोस 1 लाख 40 हजारांवर नागरिकांना देण्यात आला. टक्केवारीत हे प्रमाण 133 आहे. तर लसीचा दुसरा डोस 1 लाख 23 हजार जणांना दिला. हे प्रमाण 117 टक्केआहे. यामध्ये स्थलांतरित नागरिक, कामगार यामुळे लसीकरणाची टक्केवारी वाढलेली आहे.
तालुका पहिला डोस दुसरा डोस
जावली 79,178 67,494
कराड 4,74,537 3,87,077
खंडाळा 1,40,269 1,23,296
खटाव 2,15,584 1,85,323
कोरेगाव 1,95,341 1,71,579
म'श्वर 63,176 52,266
माण 1,61,830 1,23,874
पाटण 2,06,211 1,67,917
फलटण 2,72,994 2,27,456
सातारा 4,58,891 3,76,314
वाई 1,47,322 1,30,363