सातारा : केळवली धबधबाही ठरतोय जीवघेणा; पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

Published on
Updated on

परळी; सोमनाथ राऊत : निसर्गाची मुक्‍त उधळण असलेला केळवली धबधबा म्हणजे निसर्गप्रेमींसाठी जणू स्वर्गच. निसर्ग भरभरुन देतो पण ते घेत असताना बेशिस्तपणाला मूठमाती देण्याचीही गरज असते. केळवलीच्या या धबधब्यात शुक्रवारी एक युवक बुडाला असून शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. या घटनेने या पर्यटनस्थळाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. येथे ना सुरक्षा रक्षक, ना रेलिंग, अशी अवस्था असून पर्यटकांसाठी कोणतेही नियोजन नसल्याचे समोर आले आहे.

परळी खोर्‍यात निसर्ग सौंदर्याची खाण आहे. याच खोर्‍यात अगदी टोकाला केळवली धबधबा हे पर्यटन स्थळ विकसित झाले आहे. सातारपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. शुक्रवारी या धबधब्यातील पाण्यात सातार्‍यातील एक युवक बुडाल्यानंतर या धबधब्याच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न चव्हाट्यावर आला आहे.

गेल्या पाच वर्षांपासून केळवली धबधबा निसर्गप्रेंमींना साद घालत आहे. पावसाळी हंगामात सुट्टी दिवशी वाहने लावायलाही येथे जागा नसते. शनिवार, रविवार वा सुट्टीदिवशी परळी, नित्रळ, केळवली रस्त्यावर अक्षरश: वाहनांच्या रांगा लागतात. यामध्ये अल्पवयीन मुलं-मुलीही वाहने चालवतात. मद्य प्राशन करुन वाहन चालवणे सर्रास पहायला मिळते. मात्र पोलिस यांच्यावर काय कारवाई करतात? हा प्रश्‍नच आहे. हुल्लडबाज बिनधास्त धिंगाना घालत असल्याचे चित्र नेहमीच पहायला मिळते. मुळातच केळवली गाव लहान आहे. एका केळवली गावाची केळवली व पुनर्वसीत केळवली अशी दोन गावे झाली आहेत. उदरनिर्वाहासाठी पुरुष मंडळी मुंबईला असतात. पर्यटक येतात मात्र त्यातून गावाला उत्पन्‍नाचे काही स्त्रोत नाहीत. त्यामुळे पर्यटकांना सोयी सुविधा तरी काय देणार? अशी अवस्था आहे. लोकप्रतिनिधी वन खाने कोणत्याच प्रशासनाने या गावात पर्यटन वाढीसाठी काय करता येईल का? अशी एखादी बैठक आजपर्यंत कधीही घेतलेली नाही. एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येते. आता तरी प्रशासनाला जाग येईल का? देव जाणो!

अडचणीतील धबधबा हुल्लडबाजांना वाटतोय सोयीस्कर

केळवली धबधबा पाहण्यासाठी निसर्ग प्रेमींबरोबरच हुल्लडबाज पर्यटकांचाही ओघ वाढू लागला आहे. त्याचे कारणही तितकेच सुस्पष्ट आहे. कारण या धबधब्याच्या पाण्यात उतरण्याला कुणाचीही मनाई नाही. कुणाचे नियंत्रण नाही. मोठमोठ्या दगडांवर चढून फोटोसेशनलाही अडथळा नाही. कोठेही पायवाटेवर रस्त्यावर गोंगाट केला, अगदी कपडे काढून नाचले तरी अडवायला कोणी नाही. या परिसरात अतिउत्साही हुल्लडबाज पर्यटकांना हा अडचणीतला धबधबा सोयीस्कर वाटू लागला आहे.

पर्यटकांना सुरक्षा अन् सुविधाही द्या…

परळी, ठोसेघर, केळवली, उरमोडी धरण परिसरात हजारो पर्यटक येत आहेत. या पर्यटकांबरोबरच अनेकदा हुल्लडबाजांचा उपद्रवही वाढला आहे. त्यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्‍न समोर आला आहे. सुविधाही तोकड्या आहेत. त्यामुळे सुविधा व सुरक्षा पर्यटकांना देण्याची खरी गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news