सातारा : एकाच ठिकाणच्या मतदान केंद्रामुळे संताप

सातारा : एकाच ठिकाणच्या मतदान केंद्रामुळे संताप
Published on
Updated on

पाटण; गणेशचंद्र पिसाळ :  पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पाटण तालुक्याच्या एकाच ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आल्याने याचा सर्वसामान्य मतदार व उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे. या निर्णयाविरुद्ध उमेदवार व मतदारांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली असून लोकशाही मार्गाने मिळालेल्या अधिकारांवर गंडांतर आल्याची संतप्त भावना व्यक्त केली जात आहे. तातडीने हा निर्णय मागे घ्यावा व पूर्वीप्रमाणेच विभागनिहाय मतदान केंद्रांची निर्मिती करून सर्वांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.

पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी पूर्वीपासूनच तालुक्यातील दहा मतदान केंद्रांवर या समितीसाठी मतदान केंद्रे उभारली जायची. यामध्ये पाटण, कोयनानगर, मोरगिरी, केरळ, चाफळ, तारळे, तळमावले, ढेबेवाडी, मारूल हवेली, मल्हारपेठ या दहा मतदान केंद्रांचा समावेश असायचा व या वेळच्या निवडणूक प्रक्रियेमध्येही पूर्वी त्याचप्रमाणे मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. अचानकपणे झालेल्या शासन निर्णयानुसार आता केवळ पाटण या तालुक्याच्या एकाच ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात येणार असल्याने भौगोलिक व नैसर्गिकदृष्ट्या अतिशय अडचणीच्या असणार्‍या पाटण तालुक्यातील सर्वच मतदारांना पाटण येथे येऊन मतदान करावे लागणार आहे. यामुळे मतदार व उमेदवारांना अनेक अडचणी येणार आहेत.

मुळातच सगळीकडे सध्या शेतीची कामे सुरू आहेत. याशिवाय या समितीसाठी सोसायटी. ग्रामपंचायत अथवा अन्य व्यापारी मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने शेतकरी वर्गाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. त्यामुळे एकीकडे दिवसभरातील शेतीची कामे खोळंबली जाणार आहेत. याशिवाय तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी आर्थिक भुर्दंडही सोसावा लागणार आहे. निश्चितच याचा विपरीत परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होणार आहे. वास्तविक बाजार समितीमध्ये सर्वसामान्य माणसाला मतदानाचा हक्क मिळवून देण्याची शेखी शासनामार्फत मिरवली जात असताना आता अशा पद्धतीने अचानकपणे निर्णय घेतल्याने अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. घाईगडबडीने घेतलेल्या या निर्णयाविरुद्ध संबंधित मतदार, उमेदवारच नव्हे तर नेते मंडळींनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

निर्णय मागे घ्या

अचानकपणे तालुक्याच्या एकाच ठिकाणी मतदान घेण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मतदार व उमेदवारांसाठी अन्यायकारक आहे. अद्यापही प्रत्यक्ष मतदानाला तब्बल 25 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शासनाने याबाबत गांभीर्याने व भौगोलिक, नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास केला व लोकशाही मार्गाने कोणालाही मतदानापासून वंचित रहावे लागणार नाही याचा सहानुभूतीने विचार केला तर पूर्वीप्रमाणेच विभागनिहाय मतदान केंद्रे करणे अद्यापही सहज शक्य आहे.

तालुक्याच्या एकाच ठिकाणी सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी आदी मतदारसंघनिहाय सरासरी चारशे मतदारांसाठी एक बुथ अशा पद्धतीने मतदान घेण्याचा आदेश आहे. निवडणूक विभागाने बदल केला तर बदल करण्यात येईल.
– उमेश उमरदंड,
निवडणूक निर्णय अधिकारी, पाटण बाजार समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news