सातारा : आता तयारी दुर्गोत्सवाची; महिलांना ओढ नवरात्रीची

सातारा : आता तयारी दुर्गोत्सवाची; महिलांना ओढ नवरात्रीची
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर असतो. पितृपंधरवड्यानंतर दुर्गादेवीची प्रतिष्ठापनेची तयारी सुरु झाली आहे. कोरोना संकटानंतर प्रथमच गणेशोत्सवानंतर दुर्गोत्सवही निर्बंधमुक्त होणार असल्याने भक्तांनी विशेषत: महिला वर्गाने तयारीवर भर दिला आहे. अनेक मंडळांची मूर्ती ठरवण्यापासून ते अन्य तयारीसाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मूर्तिकामासाठी कुंभारवाड्यात लगबग सुरू झाली आहे. नवरात्रोत्सव मंडळांच्या ऑर्डरप्रमाणे दुर्गामातेची विविध रूपे साकारण्यात मूर्तिकार व्यस्त झाले आहेत.

शाडूमुळे लागतोय वेळ

यावर्षी दि. 1 सप्टेंबरपासून पीओपीच्या मूर्तींना बंदी घालण्यात आल्याने यावर्षी दुर्गोत्सवामध्ये केवळ शाडू मातीच्या मूर्ती साकारल्या जाणार आहेत. शाडू मातीच्या मूर्ती सुकण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे मागील काही महिन्यांपासूनच कार्यशाळांमध्ये दुर्गेची विविध रुपातील प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. आता या सुकलेल्या मूर्तींवर केवळ कला कुशलतेने कारागिरी करावी लागत आहे.

महिला वर्गात नवरात्रीच्या रंगांची उत्सुकता

नवरात्रोत्सव म्हणजे महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. नवरात्रोत्सवातील देवीची उपासना,धार्मिक कार्यापासून विसर्जनापर्यंत अनेक जबाबदार्‍या महिला पार पडतात. घरोघरी होणार्‍या घटस्थापनेतही महिलांच पुढाकार घेतात. त्याचबरोबर प्रत्येक वारानुसार शुभ असलेल्या रंगाचीच साडी देवीला नेसवली जाते असून रंगांचे अनुकरण महिलाही करतात. त्यामुळे नवरंगातील साड्या व ड्रेस खरेदी केली जाते. नवरात्रोत्सव जवळ आल्याने महिलांमध्ये नवरंगांची उत्सुकता वाढली आहे. बाजारपेठेही नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सज्ज होवू लागली आहे.

पावसामुळे रंगकामात अडथळे

मागील 15 दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी ढगफुटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा फटका मूर्तीकारांना बसत असून मूर्तीकाम व रंगकामात अडथळा येत आहे. सध्या बहुतांश मूर्तींच्या फिनिशींग तसेच रंगकामाची लगबग सुरु आहे. रंगाचा पहिला हात मारुन तो सुकल्यावरच अखेरचा हात मारला जातो. मात्र, वातावरणातील बदलामुळे अचानक मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी सुकण्यासाठी ठेवलेल्या मूर्ती पुन्हा प्लास्टिकच्या आवरणात ठेवाव्या लागत असल्याने मूर्तीकारांची धांदल उडत आहे.

भक्त लागले तयारीला

नुकतीच गणेशोत्सवाची धामधूम संपली आहे. गणेश भक्त निवांत झाले असले तरी लवकरच नवरात्रोत्सव सुरु होणार असल्याने दुर्गादेवीचे भक्त तयारीला लागले आहेत. पितृ पंधरवड्यानंतर घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असतो. घटस्थापनाबरोबरच दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

कुशलता लागणार पणाला

मूर्तीच्या चेहर्‍यावरील भाव, डोळ्यातील तेज या गोष्टींसाठी मूर्तिकाराचे कसब कामी येत आहे. मूर्तींचे फिनिशिंग करणे, रंगरंगोटी करणे, सुशोभीकरण व अलंकारांसाठी कुंदण मोतीकाम करणे आदि कामांसाठी कुंभारवाड्यात लगबग सुरु झाली आहे. नवरात्रोत्सव सुरु होण्यास 15 दिवस उरल्याने दुर्गादेवीच्या मूर्तिकामाला वेग आला आहे. मूर्तीच्या रंगकामासह इतर बारीक सारीक गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यावे लागत असल्याने कारागीर सहकुटुंब रात्रंदिवस कार्यशाळेत राबू लागले आहे. त्यांच्या मूर्तिकलेच्या नैपुण्यामुळेच दुर्गेच्या विविध रूपांमध्ये जिवंतपणा येणार आहे.

ऑर्डरप्रमाणे होत आहेत मूर्ती

यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा झाल्याने दुर्गोत्सवही थाटामाटात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी विविध नवारोत्रोत्सव मंडळांनी मूर्तीकारांकडे देवीच्या मूर्तींचे अगाऊ बुकिंग केले आहे. वेळेत मूर्तीकाम पूर्ण करण्यासाठी कुंभारवाड्यात लगबग सुरु झाली आहे. प्रत्येक मंडळाच्या आर्डरप्रमाणे मूर्ती घडवण्यात येत आहेत. त्यामुळे कुंभारवाड्यात दुर्गादेवीची विविध रुपे साकारली जात असून वेळेत मूर्तिकाम पूर्ण करण्यात कारागीर व्यस्त झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news