सातारा : आजपासून ‘गण’राज्य

सातारा : आजपासून ‘गण’राज्य
Published on
Updated on

सातारा;  पुढारी वृत्तसेवा : सकलांचा दाता, बुद्धिदाता विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी शाहूनगरी सज्ज झाली असून गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच सातारा शहरासह जिल्ह्यात भक्‍तिमय वातावरण निर्माण झाले आहे. गणेशभक्‍तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अवघे जनजीवन गणपती बाप्पामय होऊन गेले असून आता उत्सव काळातील 10 दिवसांत केवळ 'गण'राज्य अवतरणार आहे.
मंगळवारी सायंकाळी सातार्‍यातील मुख्य बाजारपेठेसह पोवईनाका, राजवाडा, मोती चौक, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात गणेशमूर्ती व अन्य साहित्य खरेदीसाठी गणेशभक्‍तांची झुंबड उडाली.

गणेशोत्सवास आजपासून (बुधवारी) प्रारंभ होत आहे. कोरोनानंतर यावर्षी प्रथमच मोठ्या उत्साहात बाप्पांचा उत्सव होत असल्यामुळे विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांबरोबरच घरोघरी अबालवृद्धांनी जय्यत तयारी केली आहे. बाप्पांच्या स्वागताच्या धांदलीने जिल्ह्यातील वातावरण गणेशमय झाले आहे. पूर्वसंध्येला गणेशभक्‍तांच्या उत्साहाला उधाण आलेे असून सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरीही बाप्पांच्या स्वागताची धांदल शिगेला पोहचली.

लाडक्या गणरायाचे अपूर्व उत्साहात स्वागत होणार आहे.

सातार्‍यात पोवई नाका, राजवाडा, मोती चौक, खण आळी, गडकर आळी, बॉम्बे रेस्टॉरंट अन्य परिसरात सजावट साहित्याबरोबरच घरगुती गणपती खरेदीसाठी महिला व नागरिकांनी गर्दी केली. बॉम्बे रेस्टॉरंट, कृष्णानगर परिसरात ग्रामीण भागातून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशमूर्ती नेण्यासाठी गर्दीकेली होती. मंगळवारी सकाळपासूनच शहर परिसरातील बाजारपेठ ओसंडली होती. त्यामुळे बाजारपेठेत लाखो रूपयांची उलाढाल झाली. यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर गणेशभक्तांनी भर दिल्याने इको फ्रेंडली गणेशमूर्ती, शाडूच्या मूर्ती खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे मूर्तीकारांनीही पर्यावरणपूरक मूर्तींचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले होते.

गणेशोत्सवासाठी बाजारात गुलाब, कॉर्नेशन, जरबेरा, झेंडू, गुलछडी, मोगरा व अन्य फुलांनाही चांगली मागणी होती. बाजारात देशी फळांबरोबरच परदेशी फळांची आवक मोठ्या प्रमाणात झाली असली तरीही फळांचे भाव वधारलेले आहेत. सराफ बाजारात गणपती गौरीसाठी सोन्याचांदीचे दागिने विक्रीसाठी आले आहेत. 1 ग्रॅम सोन्याची 11 शास्त्रोक्‍त आभुषणे विक्रीसाठी आली आहेत. त्यालाही नागरिकांमधून चांगली मागणी असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. प्रसादासाठी मिठाईच्या दुकानात खवा, पिस्ता, चॉकलेट, गुलकंद, स्ट्रॉबेरी, आंबा, केशरी, यासह विविध प्रकारचे मोदक विक्रीसाठी आले असून मोदकांना नागरिकांमधून चांगली मागणी आहे.
शहराबरोबरच जिल्ह्यातील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडप उभारणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे तर काही मंडळांचे कार्यकर्ते मंडप उभारणीच्या कामात मग्‍न असल्याचे चित्र रात्री उशीरापर्यंत दिसत होते. शहर व परिसरात ठिकठिकाणी मंडळांनी आकर्षक कमानी उभारून विद्युत रोषणाईही केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news