सातारा : 50 कोटी घेतल्याचे पुरावे द्या; राजकारण सोडेन

सातारा : 50 कोटी घेतल्याचे पुरावे द्या; राजकारण सोडेन

सातारा : पुढारी वृत्तसेवा

उचलली जीभ लावली टाळ्याला, असे काहीजण बोलत आहेत. 50 कोटी रुपये प्रत्येक आमदाराने घेतले, असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. कुणी काहीही म्हणेल म्हणून ते खरे मानायचे का? 50 कोटी घेतल्याचे पुरावे द्या राजकारण सोडेन, असे आव्हान माजी गृहराज्यमंत्री व शिवसेनेचे बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांनी सातार्‍यात पत्रकार परिषदेत दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. आजपर्यंत जेवढा निधी मिळाला त्याच्या कितीतरी पटीने वाट्टेल तेवढा निधी मुख्यमंत्र्यांमुळे सातारा जिल्ह्याला मिळणार आहे, अशी ग्वाहीही आ. शंभूराज देसाई यांनी दिली.

मुंबई-सुरत-गुवाहाटी-गोवा पुन्हा मुंबई ते सातारा असा अभूतपूर्व प्रवास करत सातार्‍यात परतलेल्या आ. शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. ते म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली आघाडी ही अनैसर्गिक होती. त्यांच्याविरोधात निवडणूक लढून शेवटी त्यांच्यासोबतच मंत्रिमंडळात बसण्याची वेळ आली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना आमदारांची गळचेपी सुरू होती. जिल्ह्यात शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पडलेल्या उमेदवारांना जादा निधी दिला जात होता. आमदार निधीतून केलेल्या कामांची उद्घाटने, भूमिपूजने करून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, पडलेले उमेदवार श्रेय घेत होते. फोटोबाजी, बॅनरबाजी करत होते. याबाबत पक्षप्रमुखांकडे गार्‍हाणी मांडूनही काहीच निष्पन्‍न होत नसल्याने उठाव करावा लागला.

आ. शंभूराज देसाई म्हणाले, महाविकास आघाडी करण्याचा पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला. पक्षप्रमुखांचा आदेश असल्यामुळे आम्ही तो मानला. मात्र, गेल्या अडीच वर्षांत विशेषत: शिवसेनेच्या आमदारांची, शिवसैनिकांची गळचेपी झाली. शिवसेनेचे मंत्री, आमदार, शिवसैनिकांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारा त्रास सहन करावा लागत होता. हे सर्व सहनशीलते पलीकडे गेले.

हे सगळं पक्षप्रमुखांच्या कानावर घाला असं विधानसभा गटनेते एकनाथ शिंदे यांना आम्ही सांगितले. मात्र त्यावर उपाय होवू शकला नाही. त्यामुळे आम्ही उठाव केला. शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार व 11 अपक्ष आमदार असे 51 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.गेल्या दोन-अडीच वर्षातील विकासाचा बॅकलॉग आम्ही दुप्पट वेगाने भरुन काढू.

निधी मिळत नसल्यामुळे सेना आमदारांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात असताना तुम्हाला 294 कोटींचा निधी देण्यात आल्याचे विधानसभेत जाहीर करण्यात आले, याकडे लक्ष वेधले असता आ. शंभूराज देसाई म्हणाले, अर्थसंकल्पीय तरतुदीतून आमदारांना नियमित निधी मिळत असतो. मागील पाच वर्षांचा विचार करता गेल्या अडीच वर्षांत मिळालेला निधी कमी आहे. शिवसेनेच्या आमदारांना निधी कमी कसा मिळाला हे पक्षप्रमुखांना लेखी दिले होते.

उध्दव ठाकरे तुमचे नेते आहेत काय? असे विचारले असता आ. शंभूराज देसाई म्हणाले, आम्ही शिवसेनेत आहोत. स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिवसेना पुढे घेवून आम्ही चाललो आहोत, असे त्यांनी सांगितले.ते म्हणाले, शिवसेना आमदारांकडून पराभूत झालेला आणि 2024 साली पुन्हा आमच्याच विरोधात उभा राहणार्‍यालाच राष्ट्रवादीकडून जादा निधी देण्यात आला ही वस्तुस्थिती आहे. हे पक्षप्रमुखांना दाखवून दिले आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांकडून घुसमट व्यक्‍त होत होती. आमच्या भावना वेळोवेळी मांडूनही काहीच निष्पन्न होत नसेल तर उध्दव ठाकरे यांच्याजवळ असणारी चार-दोन माणसे चुकीची माहिती त्यांना देत असावीत अशी शंकाच येते. पक्षांतर्गत सुरु असलेल्या बाबींची त्यांना माहिती का दिली जात नव्हती? पक्षप्रमुख म्हणून त्यांनी या गोष्टींचा विचार करायला हवा होता.

राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून येवून दाखवा, असे आव्हान बंडखोरांना देण्यात आले आहे, असे विचारले असता आ. शंभूराज देसाई म्हणाले, शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले 55 पैकी 40 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बहुमतात आहेत. ज्यांच्याकडे बहुमत असते त्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नसते. घोडेमैदान दूर नाही. अडीच वर्षांनीच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. माझ्यासोबत असलेला एकही आमदार पराभूत होवू देणार नाही, असा विश्‍वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्‍त केला आहे. आमच्या नेत्यावर विश्‍वास आहे. आम्ही शिवसेनेतच असून पक्ष सोडलेला नाही. शिवसैनिक आमच्यासोबतच आहेत असेही त्यांनी सांगितले.

सुरतमध्ये पहिले पाऊल शंभूराज यांचे आणि दुसरे माझे पडले असा उल्‍लेख आ. शहाजी पाटील यांच्या ऑडिओ क्लिमध्ये आहे. या बंडाची मूळ प्रेरणा तुमची होती का? असे विचारले असता आ. शंभूराज देसाई म्हणाले, उठाव सर्वांनी मिळून केला. योगायोगाने आमची पहिली गाडी पुढे गेली. एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यातील माणूस मोठा होत असेल, पक्ष वाचवण्यासाठी धाडसी निर्णय घेत असेल तर त्यांच्यासोबत आपण राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, असे शरद पवारांनी सांगितले आहे, असे विचारले असता आ. शंभूराज देसाई म्हणाले, शरद पवार बोलतात तसं कधी होत नाही असा यापूर्वीचा अनुभव आहे. 25 वर्षे महाविकास आघाडी टिकेल असे पवार म्हणाले होते, पण अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकार गेले. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार नसल्याचेही आ. देसाईंनी स्पष्ट केले. संजय राऊत यांना किती महत्व द्यायचं? त्यांच्यामुळे शिवसेनेवर ही वेळ आली. सरकारचा भाग ते कधीच नव्हते. आम्ही त्यांना महत्व देत नसल्याचेही त्यांनी सांगितलं.

गद्दारांना माफी नाही, असे म्हटले जात आहे, याकडे लक्ष वेधले असता आ. शंभूराज देसाई म्हणाले, आम्ही गद्दार नाही. आजही पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो आमच्या पाठीमागे असतो. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. 15 लोकांची की 40 लोकांची शिवसेना हे त्यांनीच ठरवावे. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असलेल्या उध्दव ठाकरे यांना आजही आम्ही मानतो. 40 लोकांची मूळ शिवसेना असून उध्दव ठाकरे यांनी आशीर्वाद द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

मंत्रीपदाबाबत विचारले असता आ. शंभूराज देसाई म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे याबाबत निर्णय घेणार आहेत. मी कुठल्याही पदाबाबत त्यांच्याकडे आग्रह धरलेला नाही किंवा तशी चर्चाही केलेली नाही. नेत्यांवर माझा पूर्ण विश्‍वास आहे. ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असेही आ. देसाई यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्ह्याच्या विकासाच्या नियोजनाबाबत विचारले असता आ. शंभूराज देसाई म्हणाले, मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचे सातारा जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचेही जिल्ह्यावर लक्ष आहे. दोघांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तुम्ही उठाव केला असताना उध्दव ठाकरे यांचा तुम्हाला काही निरोप आला का? असे विचारले असता आ. शंभूराज देसाई म्हणाले, ज्या भागात आम्ही होतो त्याठिकाणी बर्‍याचदा आमच्या मोबाईला रेंज नसायची? त्यामुळे आमच्या घरीसुध्दा फोन होत नसायचा. प्रवासात रेंज नसल्यामुळे त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला की नाही माहित नाही पण फोनला रेंजच नसायची. आम्ही आऊट ऑफ कव्हरेज होतो, असे सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news