सांगली : प्रदर्शनात विद्यार्थ्यांकडून विज्ञानाचा जागर

सांगली : प्रदर्शनात विद्यार्थ्यांकडून विज्ञानाचा जागर

उंब्रज; पुढारी वृत्तसेवा :  यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बालवैज्ञानिकांनी विज्ञान उपकरणांच्या माध्यमातून आपली कल्पकता दाखविली आहे. विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्हा व तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने विज्ञान प्रदर्शनास विज्ञान जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

विज्ञान प्रदर्शनात सुमारे १०३ पैकी १०२ उपकरणे प्रदर्शनात आहेत. बाल वैज्ञानिकांनी अत्यंत चौकस बुद्धीने कल्पकतेने निर्मिती केलेल्या उपकरणांचे सादरीकरण केले आहे. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांची अफाट कल्पकता पहावयास मिळत आहे. परखंदी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले स्मार्ट स्टेअरकेस क्लिनर, आदर्श विद्या मंदिर विंगच्या विद्यार्थ्यांने तयार केलेले ऑटोमेटीक गॅस कंट्रोलर, माध्यमिक विद्यालय मोर्वे च्या विद्यार्थ्यांने महिला स्वसंरक्षणासाठी तयार केलेले उपकरण आदी उपकरणे ही विद्यार्थ्यांच्या अफाट कल्पना शक्तीचे उदाहरणे ठरू शकतात. तर प्रदर्शनातील धान्यातील खडे बाजूला काढून धान्य निवडणे, चाळणी, फुफ्फुसाचा व्यायाम करणारे यंत्र, वाहतूक व नवोपक्रम, वॉटर अलार्म, स्मार्ट डस्टबीन, वेटर रोबोट, पर्यावरण पूरक फ्रिज ऊर्जा रूपांतर, समांतर रेषा व चौकोनाचे प्रकार, गणिती कोडे, नैसर्गिक पद्धतीने सांडपाणी शुद्धीकरण आदी उपकरणे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधणारी होती.

विज्ञान प्रदर्शने ही विद्यार्थी, शिक्षक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अधिक व्यापक होत आहेत. विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाविषयीची आस्था व कुतूहल निर्माण होण्याबरोबरच विज्ञानाच्या आविष्काराने आश्चर्यचकीत होत होते. तंत्रज्ञान, पर्यावरण, वीज, ऊर्जा, स्वच्छता, सांडपाणी यासह विविध विषयांवर आधारित विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे आहे. आज अखेर साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार, गटशिक्षणाधिकारी सन्मती देशमाने, विस्तार अधिकारी मंगल मोरे, विषय तज्ज्ञ शकुंतला देवकांत- मोहने, सौ. एस. डी. सावंत, प्रा. रोहिणी धोत्रे, सुधाकर चव्हाण, केंद्रप्रमुख मधुकर सोनवणे, जगन्नाथ कुंभार आदींच्या सहकार्याने विज्ञान प्रदर्शन पार पडत आहे. कराडच्या प्रदर्शनात विज्ञानाचा जागर सुरू असून विद्यार्थ्यांचे कुतूहल जागृत होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news