विधवा प्रथा निर्मूलनासाठी पालिकेचा पुढाकार

विधवा प्रथा निर्मूलनासाठी पालिकेचा पुढाकार

कराड : पुढारी वृत्तसेवा
राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने तसेच समाजात विधवा प्रथा बंद करणेबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी कृतिशील कार्यवाही व्हावी, यासाठी कराड नगरपरिषदेने पुढाकार घेतलेला आहे.

21 व्या शतकात वावरत असताना, विज्ञानवादी व प्रगतिशील समाज म्हणून आपण वाटचाल करत असलो तरीही, पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूञ तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यासारख्या प्रथांचे समाजात पालन केले जात आहे. पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला विधवा म्हणून समाजात वावरत असताना अवहेलनेस सामोरे जावे लागते.

या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होवू दिले जात नाही. या कुप्रथांचे पालन होत असल्याने अशा व्यक्तींना प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी अधिकाराचे तसेच भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हक्काचेही उल्लंघन होते. या महिलांना त्यांचा आधार देणे समाजाचे कर्तव्य आहे. त्यामुळेच कराड पालिकेने पुढाकार घेतला आहे.

महिलांना कुटुंबातील मारहाण, लैंगिक छळ तसेच मानसिकदृष्ट्या असंतुलित महिलांना सामाजिक, मानसशास्त्रीय, कायदेशीर समुपदेशनासाठी शहरातील महिलांनी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या कृष्णामाई महिला समुपदेशन केंद्र, कराड सौ. दीपाली दिवटे प्रमोद जगदाळे यांच्याशी संपर्क साधावा.

तसेच महिला सन्मानासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा व समाजातील महिलांसाठी कार्य करणार्‍या सेवाभावी संस्थांनी आपली नोंदणी महिला व बालकल्याण विभागात करून राष्ट्रीय कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news