वरकुटेत वाळू अड्ड्यावर छापा; 51 लाखांचा मुद्देमाल जप्त

वरकुटेत वाळू अड्ड्यावर छापा; 51 लाखांचा मुद्देमाल जप्त

म्हसवड ; पुढारी वृत्तसेवा : वरकुटे-म्हसवड, ता. माण येथील माणगंगा नदीपात्रामध्ये जिल्हा पोलिसाच्या विशेष पथकाने धाड टाकून बेकायदा वाळू उत्खनन व वाहतूक करणार्‍यांचा पर्दाफाश केला. या छाप्यात 51 लाख रुपयांचे पोकलॅन, डंपर, वाळू पोलिसांनी जप्त करून महसूल प्रशासनाकडे दिली. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून विशेष शाखेच्या पथकाच्या कारवाईने स्थानिक महसूल व म्हसवड पोलिसांची गोची झाली आहे.

कृष्णा बळीराम चोरमले (रा. बीड), डेगलाल भुनेश्वर राणा (रा. बारशिंगा, बरगहट्टा हजारीबाग झारखंड), भैया मधुकर चव्हाण (रा. वरकुटे-म्हसवड), नामदेव गुलबा शिंदे (रा. पानवण, ता. माण), विजय धर्मा शिंदे (रा. ढाकणी, ता. माण) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ही कारवाई दि. 17 जून रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वरकुठे- म्हसवड, ता. माण येथे करण्यात आली. वाळूच्या ठेक्यावर अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांच्या विशेष पथकाला समजली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने छापा टाकला.

घटनास्थळी पोलिसांना 2 पोकलॅन, 2 ट्रॅक्टर, वाळूने भरलेला डंपर व वाळूचा साठा असा सुमारे 51 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. पोलिसांनी याबाबतची माहिती स्थानिक महसूल यंत्रणेला दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन होवून बेकायदा उत्खनन होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी मुद्देमाल जप्त करुन तो मुद्देमाल महसूलकडे वर्ग केला. तसेच याप्रकरणी दुपारी उशीरा म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, वरकुटे-म्हसवड येथे वाळू अड्ड्यावर पोलिसांचा छापा पडल्याची माहिती परिसरात पसरल्यानंतर पोलिस ठाण्यासह परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील सपोनि डी. एस. वाळवेकर, पोलिस हवालदार राणी फाळके, ओंकार दिक्षीत, अमित शेडगे, प्रसाद शिंदे, रुद्रयान राऊत, तडाखे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news