मायणीत पावसाचा तडाखा; भिंत कोसळून 6 गंभीर

मायणीत पावसाचा तडाखा; भिंत कोसळून 6 गंभीर
Published on
Updated on

मायणी : पुढारी वृत्तसेवा : 
सोसाट्याच्या वार्‍यासह मान्सूनपूर्व पावसाने मायणी, चितळी, कानकात्रे परिसराला चांगलेच झोडपून काढले. वेगाने वाहणार्‍या वार्‍यामुळे ठिक ठिकाणी रस्त्याकडेची अनेक झाडे पडल्याने वाहतूक विस्कळित झाली. तर काही ठिकाणी घराचे पत्रे उडाले व फळपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, मायणी बाजारपेठेत भिंत अंगावर कोसळल्याने सहाजण गंभीर जखमी झाले आहेत.

रविवारी दिवसभर हवेत प्रचंड उखाडा जाणवत होता. दुपारनंतर त्याची तीव्रता अधिकच वाढली. चारच्या सुमारास अचानक आभाळ भरुन आले. पावणे पाच वाजता सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. तासभर पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजारातील व्यापारी व ग्राहकांची त्रेधात्रिपीट उडाली.सोसाट्याच्या वार्‍यामुळे मायणी स्टॅडच्या प्रवेशद्वारालगत असलेले पुरातन पिंपरणीचे मोठे झाड उन्मळून पडले. झाडाखाली उभ्या असलेल्या सात ते आठ दुचाकींवरच हे झाड कोसळ्यालने दुचाकींचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, भाजीपाला विकण्यासाठी भिंती कडेला बसलेल्या काही व्यापार्‍यांच्या अंगावर भिंतीच्या विटा पडल्याची घटना घडली. यामध्ये चार-पाच व्यापारी जखमी झाले आहेत. तसेच पटेल स्वा. मिल समोरचे झाड पडल्याने झाडाखाली असलेले चहा व वडापावच्या गाड्यांचे नुकसान झाले. विटारोडला असलेल्या चव्हाण फर्निचर दुकानाजवळचे लिंबाचे झाड दुकानाच्या बोर्डवर पडले तर समोरच्या बाजूला असलेल्या ढाब्याजवळील बाभळीचे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली. मायणी-विटा रोडवरील माने वस्तीजवळ बाभळीचे झाड उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती. दोन्ही बाजूला लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.कानकात्रे येथील छगन गोविंदा जाधव यांच्या घरावरील पत्र्याचे छत उडून बाजूला पडले. घरातील टीव्ही, फ्रीज आदी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच द्राक्षबागांसह फळझाडांचेही नुकसान झाले आहे. या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

जखमींवर मायणी, म्हसवड, सातार्‍यात उपचार

मायणी बाजारपेठेत भिंत अंगावर पडल्याने सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. सुजाता पिलाजी दगडे (वय 56, मायणी), भगवान पांडुरंग भोसले (वय 59), आशाबाई भगवान भोसले (वय 52, दोघे रा. वरकुटे, ता. माण) रंगूबाई तानाजी निकम (वय 55, रा. गुंडेवाडी), संगीता संजय मोरे (वय 57, रा. निमसोड), सपना सोमनाथ लुकडे (वय 32 रा. मायणी) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर मायणी, म्हसवड, सातारा व कराड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी जखमींची भेट घेवून विचारपूस केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news