माझी भाकरी… माझा झुणका.. सद्गुरू आश्रमशाळेचा शैक्षणिक उपक्रम

माझी भाकरी… माझा झुणका.. सद्गुरू आश्रमशाळेचा शैक्षणिक उपक्रम

रेठरे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा : स्त्री-पुरुष समानता, स्वच्छता, , 'स्व'ची जाणीव, पुस्तकी ज्ञानाबरोबर स्वयंपाकाचे कौशल्य अवगत व्हावे तसेच विद्यार्थी स्वावलंबी व्हावा या उद्देशाने शेरे (ता. कराड) येथील सद्गुरू आश्रमशाळेने 'माझी भाकरी माझा झुणका' हा आनंददायी आणि अभिनव उपक्रम राबवला. हा उपक्रम आणि स्पर्धा ऐच्छिक ठेवण्यात आली असतानाही अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन आपले कौशल्य दाखवले.

अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या निमित्ताने या उपक्रमात भाग घेऊन भाकर्‍या बनवल्या. त्यामुळे आपणही स्वावलंबी व्हायला पाहिजे ही जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण झाली. तर भाकरी आम्हाला बनवायला येतच नाही हा गैरसमज या निमित्ताने दूर झाला. तोडकीमोडकी का होईना आम्ही भाकर्‍या बनवू शकतो याची जाणीव आम्हाला झाली, अशा प्रतिक्रिया यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी भात बनवणे, पाचवी ते नववी च्या विद्यार्थ्यांना भाकरी बनवणे तसेच विद्यार्थिनींना झुणका बनवणे अशा स्पर्धा घेण्यात आल्या. भाकरीचा आकार व चव हे निकष ठेवून क्रमांक काढण्यात आले. तर झुणक्यासाठी तसेच निकष वापरून क्रमांक घोषित करण्यात आले. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनीही भात बनविण्याचा प्रयत्न केला. स्पर्धेसाठी प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांचे गट करून एक गटनायक नेमण्यात आला होता. गटनायकाने प्रत्येकाला लागणारे साहित्य वाटून दिले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी उपक्रमासाठी आवश्यक असणारे साहित्य आणले होते. चुल मांडण्यापासून भाकरी तसेच झुणका करण्यापर्यंत सर्व कृती या बालचमुनीं करून एक वेगळा अनुभव या उपक्रमाच्या निमित्ताने घेतला. राज्यातील हा एक आगळावेगळा आणि अभिनव उपक्रम आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक मिलिंद बनसोडे, संभाजी पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.

यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी आष्पाक अत्तार, प्रमोद रामधुमाळ, विष्णू खरात, अभिजीत आडके, रेखा पाटील, संतोष भालेराव, सुजाता भोसले, सुमती माने, पंडितराव जाधव, रोहित पाटील, नितीन पाटील, वैभव शिंगे, डी. आर. पाटील, प्रकाश निकम, पांडुरंग गायकवाड, स्वाती चांदणे यांनी प्रयत्न केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news