भ्रष्टाचारी साविआचा कडेलोट करणार का? आ. शिवेंद्रराजे यांचा खा. उदयनराजेवर पलटवार

भ्रष्टाचारी साविआचा कडेलोट करणार का? आ. शिवेंद्रराजे यांचा खा. उदयनराजेवर पलटवार
Published on
Updated on

सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा : उदयनराजेंचा आमदारकीला आणि त्यानंतर खासदारकीला असा दोनवेळा पराभव झाला. हा त्यांचा राजकीय प्रवास आहे. बायोमायनिंगचे काम बोगस झाले आहे. प्रशासकीय इमारत जागा हस्तांतरणात गौडबंगाल आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे काम जादा दराने टेंडर भरणार्‍या ठेकेदारालाच का दिले? नगर पालिकेत एसीबीने केलेल्या कारवाईनंतर कर्मचार्‍यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यातील संभाषणानुसार 5 टक्के पार्टी फंड कुणाला जातो? सत्‍तेत तुमचीच आघाडी आहे. मग सातारा विकास आघाडीचा कडेलोट करणार का? असा सवाल करत आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्यावर पत्रकार परिषदेत पलटवार केला.

खा. उदयनराजे भोसले यांनी आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर 'सुरुची' या त्यांच्या निवासस्थानी भूमिका स्पष्ट करताना आ. शिवेंद्रराजे म्हणाले, जिल्ह्याचा होणारा विकास माझ्यामुळेच आणि काम रखडल्यास बाकीचे लोकप्रतिनिधी जबाबदार अशी उदयनराजेंची भूमिका आहे. त्यांनी दोन-तीन दिवस मुंबईचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनाही ते भेटले. त्यानंतर त्यांचा आविर्भाव पाहिला. चिडून, चवताळून बोलण्यासारखं मुंबईत काय झालं? कदाचित त्यांचा हा दौरा अपेक्षेप्रमाणे झाला नाही का? अपेक्षेप्रमाणे त्यांना फळ मिळाले नसावे, असे माझे रिडिंग आहे. मुंबईत काहीतरी बिनसले आहे. त्यांच्या नेहमीच्या टिकेत कुचकेपणा असायचा पण आता त्यांच्या बोलण्यातून राग व्यक्‍त होवू लागला आहे. मला मात्र फरक पडत नाही. मला अल्हादपणे आमदारकी मिळाली असे ते सांगतात. विधानसभेला त्यांचा पराभव करुन 10 हजाराच्या मताधिक्याने निवडून आलो, हे त्यांनी विसरु नये. त्यांचा यातून बालिशपणा दिसून येतो.

त्यांनी नगरसेवकापासून राजकीय सुरुवात केल्याचे ते सांगत असले तरी त्याच निवडणुकीत एका वॉर्डमध्ये ते निवडून आले तर दुसर्‍या वॉर्डात ते पराभूत झाले, ही त्यांची सातार्‍यातील लोकप्रियता आहे. विकासपुरुष आहात तर दोन्ही वॉर्डातून निवडून यायला हवे होते. पूर्वी प्रतापराव भोसले, हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्याविरोधातही खासदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाले. त्यांच्यात इर्षा, इगो, जलसी प्रचंड आहे. मी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांनी निवडून येवूनही अट्टाहासाने तीनच महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. ही त्यांची राजकीय कारकीर्द आहे.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सध्याची मध्यवर्ती नगरपालिका इमारत सुस्थितीत असताना 70 कोटी खर्चून नवी प्रशासकीय इमारत बांधण्याचा घाट का घातला हे लोक जाणून आहेत. नवी इमारत बांधावी, अशी लोकांची मागणी होती का? असा काय कारभार वाढलाय? जुन्या इमारतीतून कारभार करताना काय दिले लावले? कॅम्प परिसरातील नागरिकांसाठी ऑडिटोरियम व्हावे, या हेतूने भाऊसाहेब महाराजांनी ती जागा टाऊन हॉलसाठी आरक्षित केली. संबंधित जागा 53 गुंठे आहे.

नाममात्र 1 रुपयावर कल्याणी यांनी जागा दिल्याचे उदयनराजे सांगत असले तरी नगरपालिकेची इमारत 40 गुंठे जागेवर बांधण्यात येणार आहे. उरलेली कोट्यवधी किंमतीची 13 गुंठे जागा कल्याणी यांना देण्यात येणार आहे. 70 कोटींची इमारत सरकारी अनुदानातून बांधण्यात येणार आहे. मग कल्याणी यांनी नगरपालिकेला काय मदत केली आहे का? किंवा सध्याच्या इमारत बांधकामात कल्याणींची स्पॉन्सरशिप आहे का? जागा हस्तांतरणात गौडबंगाल आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातार्‍यात स्वत: काय उभे केले ते त्यांनी दाखवावे. गेल्या पाच वर्षांत सातार्‍याचा काहीही विकास केला नाही. प्रधानमंत्री आवास योजनेचे काम गेली चार वर्षे रखडले आहे. कमी दराने आलेल्या निविदेनुसार संबंधित ठेकेदाराला काम न देता जादा दराने निविदा भरलेल्या नाशिकच्या ठेकेदाराला काम देण्यात आले. या ठेकेदारावर एवढे प्रेम का? सातार्‍यात ठेकेदार नव्हते का? याची तक्रार आजही सुरु आहे. याचे रेकॉर्ड नसले तरी यामध्ये काय काय झाले हे लोकांना माहित आहे. सातारा पालिकेतील तत्कालीन अतिरिक्‍त मुख्याधिकारी आणि आरोग्य विभाग प्रमुखाला लाच लुचपत विभागाने अटक केली. या दोघांतील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असल्याचे सांगत आ. शिवेंद्रराजे यांनी ती क्लिप माध्यमांसमोर ऐकवली.

नगरपालिकेत कुणाची पार्टी सत्‍तेत आहे? पार्टी फंड व इतरांसाठी दिल्या जाणार्‍या कमिशनची चर्चा असल्यामुळे आता संपूर्ण सातारा विकास आघाडीचा कडेलोट करायचा का? उदयनराजेंनी आता ठरवावे. सर्वसामान्य स्त्री म्हणून माधवीताईंना अधिकारच ठेवले नव्हते. गेली 20 वर्षे जंतूनाशकाचे टेंडर सोलापूरच्या एकाच ठेकेदाराला का दिले जाते? एकच ठेकेदार ही पावडर पुरत असल्याने त्या पावडरमध्ये असं काय आहे? एवढी भारी पावडर येत असेल तर सातार्‍यात आजाराची साथ कशी काय येते? याची तपासणी करायला हवी.

राज्याच्या बजेटमध्ये तरतूद करण्यासाठी उदयनराजे कुणाला जावून भेटले? हा प्रकल्प अडकला त्यावेळी त्यांनी काय प्रयत्न केले. धरणाचे काम करतानाच पाईपलाईनचे काम होणे आवश्यक होते. नियोजशून्य कारभारामुळे आता ते काम मार्गी लागत आहे. मात्र या कामाचा ठराव नगरपालिका प्रशासनाने केला. मुदत संपल्यानंतर उदयनराजे आणि आघाडीचा संबंध काय? हा त्यांचा बोगसपणा असल्याचे सांगत त्यांनी ठरावाच्या प्रती सादर केल्या.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, संजय पाटील यांचे पं.स. सदस्यपद वाचवण्यासाठी हद्दवाढ करायची नाही. झेडपीत हद्दवाढीसंदर्भात ठराव होवू द्यायचा नाही, अशा त्यांच्या रवी साळुंखे यांना सुचना होत्या. त्यामुळे हद्दवाढ दोनवर्षे रखडली. 48 कोटी हद्दवाढ भागासाठी मिळाले असताना कोण दादा? असे उदयनराजे विचारत आहेत. ते कुणाला भेटले याचे स्पष्टीकरण देताना आ. शिवेंद्रराजे यांनी अजित पवार व उदयनराजे यांच्या भेटीचा पुणे सर्किट हाऊस येथील फोटो माध्यमांना दाखवला.

कडेलोट करतो म्हणणं सोपं आहे. आता आपण सतराव्या शतकात रहात नाही. राजेशाही संपली. लोकशाहीत या. लोकशाही माना. लोकशाही मार्गाने भाषा करा. याचा कडेलोट करु. त्याला हत्‍तीच्या पायाखाली देतो, समोरासमोर या हे कशाला? जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर पेढे द्यायला आले तेव्हा समोरा समोर होतोच ना! आता गांधी मैदानावर बोलायचे सोडले आणि पोवईनाक्यावर या असे म्हणत आहेत. यावेळी विरोधी पक्षनेते अशोक मोने, नगरसेवक रवींद्र ढोणे, अविनाश कदम, शेखर मोरे-पाटील, माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण आदि उपस्थित होते.

आगामी पालिका निवडणुकीत त्यांच्यावर घरी बसण्याची वेळ

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, आगामी सातारा नगरपालिका निवडणुकीत सातारकर उदयनराजेंच्या आघाडीला धक्‍का दिल्याशिवाय राहणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आले आहे. याचे फस्ट्रेशन त्यांना आले आहे. आगामी पालिका निवडणुकीत त्यांच्यावर घरी बसण्याची वेळ येणार आहे. 50 नगरसेवक निवडून आणण्याची गॅरंटी आहे तर त्यांचा तीळपापड का होतो? सुंदर काम केले तर का घाबरता? सातारा विकास आघाडीचे राजकारण संपुष्टात आले आहे. सातारा पालिकेतून यांचा कडेलोट होणार आहे, ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news