महाबळेश्वर : बॅबिंग्टन पॉईंट मोजतोय अखेरच्या घटका

महाबळेश्वर : बॅबिंग्टन पॉईंट मोजतोय अखेरच्या घटका
Published on
Updated on

महाबळेश्वर : पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर बाजारपेठेतपासून अंदाजे तीन किमी अंतरावर असलेल्या प्रसिद्ध बॅबिंग्टन पॉईंटची वनविभागाच्या अक्षम्य दुर्लक्ष व उदासीन भूमिकेमुळे प्रचंड दूरवस्था झाली आहे. चहुबाजूनी तुटलेल्या अवस्थेतील तारेचे कंपाऊंड, दारूच्या बाटल्या, चकण्याची पाकिटे, बकालपणा व अस्वच्छतेमुळे एकेकाळी पर्यटकांची मांदियाळी असलेले हे प्रेक्षणीय स्थळ आता अखेरच्या घटका मोजत आहे. या प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळास पूर्वीचे गतवैभव प्राप्त करुन देण्याची गरज निर्माण झाली आहे.

महाबळेश्वर बाजारपेठेपासून केवळ तीन किमीच्या अंतरावर तापोळा मुख्य रस्त्यापासून जवळच बॅबिंग्टन पॉईंट असून ब्रिटिशकाळापासून सौंदर्याचा अप्रतिम अविष्कार असलेला हा बॅबिंग्टन पॉईंट पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. एकेकाळी विविधरंगी फुलांनी बहरलेले गार्डन, सुर्यास्थाचे विहंगम दृश्य, डोंगररांगा, निसर्गरम्य परिसर, पॉईंटवरील सुंदर हवा, निरव शांतता हे या प्रेक्षणीयस्थळाचे प्रमुख वैशिष्ट होते. एकेकाळी या ठिकाणी पर्यटकांची मांदियाळीच अनुभवावयास मिळायची. आता मात्र भकासपणाच अनुभवावयास मिळत आहे. पर्यटनस्थळाचा विकास हेच पर्यटनास चालना देण्यासाठी महत्वाचे आहे याचा विसर वनविभागास पडला आहे. ठरावीक प्रेक्षणीय स्थळांकडे पूर्णपणे लक्ष देण्याच्या धोरणामुळे या सुंदर निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळाकडे मात्र सोईस्कर दुर्लक्ष झाल्याने पॉईंटला अवकळाच आली आहे. काही वर्षांपूर्वी या पॉईंटवरुन सुर्यास्थाचे विहंगम दृश्य नजरेस पडायचे आता मात्र सूर्यास्थ देखील दृष्टीक्षेपात पडत नाही.

बॅबिंग्टन पॉईंटची कालची शान जवळजवळ संपली असून त्याची जागा पर्यटकांऐवजी आता तळीरामांनी घेतली असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. निसर्गरम्य, आरामदायक व सुरक्षित अशा वातावरणात तळीराम येथेच आपला कार्यक्रम पार पाडत आहेत. यात भरीस भर म्हणजे तेथेच लाकडं गोळा करुन चूल पेटवून जेवणाचा देखील आनंद घेत आहेत.

पूर्वी विविध रंगी फुलांनी बहरलेले हे गार्डन आता दारुच्या बाटल्या अन् चकण्याच्या पाकिटांनी बहरले आहे. त्यामुळे अस्वच्छता व बकालपणा या परिसरात अनुभवावयास मिळत आहे. या निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळाचा विकास हा मुंबई पॉईंटच्या धर्तीवर करण्यात आला तर या परिसराला पूर्वीचे गतवैभव प्राप्त होईल. यासाठी वनविभागाने लक्ष देवून प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news