प्रतापगड किल्ल्याचा 200 कोटींचा आराखडा

प्रतापगड किल्ल्याचा 200 कोटींचा आराखडा
सातारा; आदेश खताळ :  प्रतापगड किल्ल्याची देखभाल व्हावी यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी सुमारे 200 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. गडावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण, तटबंदी व बुरुजाचे बळकटीकरण, पर्यटक निवासी व्यवस्था, प्रशस्त पार्किंग, अरुंद रस्ते, तलावाचे सुशोभीकरण, भवानी मंदिराचा जीर्णोद्धार, पर्यटक स्वागत केंंद्र या कामांचा आराखड्यात समावेश  करण्यात आला आहे.

प्रतापगड विकास प्राधिकरणाकडे निर्णय

छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी खोरे जिंकल्यावर ज्याठिकाणी प्रतापगड आहे तिथे भोरप्याचा डोंगर किंवा ढोरप्याचा डोंगर होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानंतर प्रधानमंत्री मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांनी 1656 ते 1658 या कालावधीत प्रतापगडाचे काम पूर्ण केले. नीरा, कोयना आणि इतर नद्यांकाठच्या प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी हा किल्ला उभारला. स्वराज्यावर चाल करून आलेला अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 10 नोव्हेंबर 1659 मध्ये गडाच्या तटबंदीखाली लढाई झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी ठार करून प्रताप केला. प्रतापगडाची मालकी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, पुरातत्त्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही किल्ल्याची देखभाल करण्यात आली होती, असे सांगितले जाते. मात्र, आता शासनाने स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. किल्ल्याच्या बाबतीत सर्व निर्णय भविष्यात प्रतापगड विकास प्राधिकरण घेऊ शकते.

खा. उदयनराजेंच्या अध्यक्षतेखाली किल्ले प्रतापगड विकासाचे नवे पर्व

350 वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती शिवाजी महाराजांचे  थेट 13 वे वंशज खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी किल्ले रायगडाच्या धर्तीवर छत्रपती उदयनराजे यांच्या मागणीनुसार प्रतापगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली. विशेष म्हणजे या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खा. उदयनराजे भोसले यांची निवडही त्यांनी जाहीर केली. त्यामुळे किल्ले प्रतापगडाच्या नव्या विकास पर्वाला सुरुवात झाली. येणार्‍या काळात खा. उदयनराजे यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या किल्ल्याचा विकास वेगाने होणार आहेे.

आर्किटेक्चर आणि पर्यटनासाठी प्रयत्न

पार्किंग आणि पर्यटक स्वागत केंद्र उभारावे लागणार आहे. त्यामध्ये 2 टप्प्यांमध्ये पार्किंग सुचवले आहे. टॉयलेट ब्लॉक व पर्यटक स्वागत केंंद्राची आवश्यकता आहे. त्याशिवाय ओपन एअर अ‍ॅक्टिव्हिटीज सुचवल्या आहेत. त्यामध्ये काही मुख्य योजनांचा समावेश करण्यात आला आहे. डेस्टिनेशन वेडिंग सेटअप, अँफिथिएटर, लाईट आणि साऊंड शो याची व्यवस्था करावी. तलावाभोवती बसण्यासाठी सुविधा उपलब्ध करून लहान मुलांच्या खेळासाठी काही क्षेत्र विकसित करावे. पर्यटकांसाठी ऐतिहासिक लूक असलेला पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध केल्या जातील. गॅझेबो उभारून स्वच्छतेसाठी ठिकठिकाणी डस्टबिन आवश्यक असल्याचे आरखड्यात म्हटले आहे.

असा आहे किल्ल्याचा विकास आराखडा

प्रतापगड किल्ल्याच्या विकास आराखड्यासाठी खर्चाच्या काही बाबी सुचवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बुरुजाच्या बळकटीकरणासाठी 27 कोटी 36 लाख, तटबंदी दुरुस्ती आणि जीर्णोद्धार 113 कोटी, प्रवेशाची रचना दुरुस्ती आणि जीर्णोद्धार 26 लाख, राजमार्ग ते भवानी मंदिर जीर्णोद्धार 3 कोटी 50 लाख, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा 1 कोटी 80 लाख, हॉल संवर्धन 2.10 कोटी, टॉयलेट ब्लॉक्स नवे बांधकाम 50 लाख, तलाव संवर्धन आणि कायाकल्प 3 कोटी 75 लाख, पीडब्ल्यूडी नवे विश्रामगृह 1 कोटी 15 लाख, तंबू 9 लाख, पर्यटक माहिती केंद्र 95 लाख भवानी मंदिर दुरुस्ती आणि जीर्णोद्धार 4 लाख, सभा मंडप पुनर्रचना 1 कोटी 10 लाख असे एकूण 155 कोटी 60 लाख तसेच रॉयल्टी आणि चाचणी शुल्क 3 कोटी 11 लाख असे एकूण 158 कोटी 71 लाखांची आवश्यकता आहे. याशिवाय या कामाच्या अनुषंगाने इतर खर्चही अपेक्षित आहे. त्यामध्ये पीएमसी शुल्क 2 टक्के प्रमाणे 3 कोटी 18 लाख, कामगारांचा विमा यासाठी 78 लाख, जीएसटी 28 लाख, आकस्मिक खर्च 6 कोटी 22 लाख, संगणकीकरण 3 कोटी11 लाख असे सर्व मिळून सुमारे 200 कोटींचा विकास आराखड तयार करण्यात आला आहे.

दुरुस्तीअभावी नुकसान

किल्ल्याची तटबंदी, गडावरील मातीची प्रचंड धूप, भूस्खलन, किल्ल्याचे बुरूज आणि भिंती जीर्ण झाल्या आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवर झाडे-झुडपे वाढली आहेत. तटबंदीची दगडी भिंत कोसळली असून तटबंदीच्या बाहेरील खडकाखालची पायाची माती ढासळली आहे. सध्याच्या दगडी बांधकामाला विविध ठिकाणी भेगा (क्रॅकिंग) पडल्या आहेत. फरसबंदी किंवा फुटपाथांची, पायर्‍यांची दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीअभावी किल्ल्याचे नुकसान झाले आहे. यातील काही भाग दुरुस्त केला असला तरी त्याचे स्वरूप मूळ ऐतिहासिक भागापेक्षा वेगळे दिसत आहे. त्यामध्ये बदल करावा, असे सुचवण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  पुतळ्याचे सुशोभीकरण

प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आहे. या पुतळ्याच्या पायथ्याशी ग्रॅनाईट आणि मार्बल टाईल्ससह फ्लोअरिंग लावले आहे. धातूपासून पुतळ्याचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ग्रॅनाईट क्लेडिंग आणि संगमरवरी फ्लोरिंग फरशा काढाव्या लागणार आहेत. किल्ल्याच्या मूळ बांधकामास मिळत्याजुळत्या नवीन दगडी फरशी किंवा फरसबंदीसह काम करावे लागणार आहे.

दुरुस्तीअभावी नुकसान

किल्ल्याची तटबंदी, गडावरील मातीची प्रचंड धूप, भूस्खलन, किल्ल्याचे बुरूज आणि भिंती जीर्ण झाल्या आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवर झाडे-झुडपे वाढली आहेत. तटबंदीची दगडी भिंत कोसळली असून तटबंदीच्या बाहेरील खडकाखालची पायाची माती ढासळली आहे. सध्याच्या दगडी बांधकामाला विविध ठिकाणी भेगा (क्रॅकिंग) पडल्या आहेत. फरसबंदी किंवा फुटपाथांची, पायर्‍यांची दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीअभावी किल्ल्याचे नुकसान झाले आहे. यातील काही भाग दुरुस्त केला असला तरी त्याचे स्वरूप मूळ ऐतिहासिक भागापेक्षा वेगळे दिसत आहे. त्यामध्ये बदल करावा, असे सुचवण्यात आले आहे.

प्रतापगडावर कोणत्या उपाययोजना सुचवल्या?

बुरुजाच्या खालच्या टेकडीचा उतार व खडकांचे संरक्षण रॉक बोल्टींग मातीच्या खिळ्यांद्वारे करणे, दगडी बांधकामात पूर्वीसारख्याच आकाराचे दगड वापरून तटबंदीची पुनर्बांधणी करणे. मोठ्या प्रमाणावर वाढलेली झाडे झुडपे काढून ती भविष्यात वाढू नयेत यासाठी तणनाशक फवारणी करायला हवी. मेटॅलिकपिन वापरून क्रॅक मजबूत करायला हव्यात. निष्क्रिय क्रॅक ग्राऊट करणे आवश्यक आहे. चुना वापरून सांधे उपचार करणे आवश्यक आहे. दगडी पायर्‍यांमधून पेव्हर्स, टाईल्स काढून मूळ पायर्‍यांशी मिळत्याजुळत्या दगडी पायर्‍या पुन्हा बसवाव्या लागतील. बसण्याच्या जागेचे दगडी बांधकामात पुन्हा बांधकाम, प्रवेशासाठी मुख्य मार्गाचे रुंदीकरण आवश्यक आहे. किल्ल्याची देखभाल दुरुस्ती व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह नव्याने उभारावे लागणार आहे. पर्यटकांसाठी घरे बांधणे व पर्यटकांच्या आवडीनुसार तंबूंची व्यवस्था, टूरिस्ट इंटरप्रिटेशनर सेंटर या उपाययोजना सुचवल्या आहेत.
  • पश्चिम भारतातील महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेला प्रतापगड हा मोठा डोंगरी किल्ला आहे. 
  • हा किल्ला महाबळेश्वर पासून 24 कि. मी.  अंतरावर आहे. 
  •  समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची 1 हजार  80 मीटर आहे. 
  •  किल्ल्याचे क्षेत्र सुमारे 51 एकरात विस्तारले आहे. 
  •  या किल्ल्यास दरवर्षी सुमारे 10 ते 15 लाख  पर्यटक भेट देतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news