पूरप्रवण क्षेत्रासाठी ९ बोटी, २०० होमगार्डस

पूरप्रवण क्षेत्रासाठी ९ बोटी, २०० होमगार्डस
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात मान्सूनच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यात 124 गावे धोकादायक समजली जात असून या ठिकाणच्या आपत्कालीन स्थिती निवारणासाठी तयारी सुरु करण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. पूरप्रवण क्षेत्रासाठी 9 बोटी व 200 होमगार्डस तैनात करण्यात आले आहेत.

गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. जिल्ह्याच्या सातारा, महाबळेश्‍वर, जावली, पाटण, वाई, कराड तालुक्याच्या दुर्गम व डोंगरी भागात रस्त्यावर दरडी कोसळल्यामुळे गावोगावचा संपर्क तुटला होता. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. दरडी कोसळणार्‍या घाट रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाला आतापासूनच सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. गतवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळून 14 गावे मातीच्या ढिगार्‍याखाली गेली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तहानी झाली होती. या सर्व घटना डोळ्यासमोर ठेवून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे.

जिल्ह्यात महाबळेश्‍वर, पाटण, जावली व सातारा तालुक्यात सुमारे 124 दरडग्रस्त गावे आहेत. ही गावे डोंगरकपारीत वसली असल्याने गावांना दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका आहे. त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, तलाठी, आशा प्रवर्तक, अंगणवाडी सेविका, माजी सैनिक, युवक व नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामध्ये आपल्या परिसरातील डोंगर भागात सलग तीन दिवस पाऊस पडत असल्यास जमिनीला भेगा पडणे, विहीरीत पाणी वाढणे किंवा कमी होणे, झर्‍यातून गढूळ पाणी येणे, झाडे पडणे, खांब वाकणे अशा घटना घडल्यास तेथील नागरिकांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर कराड येथे सुमारे 9 बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दोरखंड, लाईफ जॅकेटसह इतर साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच पाटण, कराड, सातारा व वाई तालुक्यातील 200 होमगार्डसना प्रशिक्षणही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत देण्यात आले आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास तातडीची मदत प्रशिक्षीत होमगार्डसकडून मिळणार आहे.

रस्ते बंद होवू नयेत म्हणून….

जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी घाट रस्ते आहेत त्या ठिकाणी दरडी कोसळत असल्याने रस्ते बंद होवून गावांचा संपर्क तूटू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागावर जबाबदारी देण्यात आली आहे.त्यासाठी नोडल अधिकार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे.प्रशासनामार्फत सर्वच यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.
– देविदास ताम्हाणे,
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news