पाटण : अतिरिक्‍त १५ टीएमसीमुळे भारनियमन टळले

पाटण : अतिरिक्‍त १५ टीएमसीमुळे भारनियमन टळले
Published on
Updated on

पाटण : गणेशचंद्र पिसाळ
यावर्षी पश्चिम वीजनिर्मितीसाठी कोयना धरणातील ज्यादा पाणी वापराचा लवादाच्या आरक्षित कोट्यावर गंभीर परिणाम झाला. मात्र त्यावर राज्य शासन व प्रशासनाने सकारात्मक पावले उचलून तब्बल 15 टीएमसी अतिरिक्त पाणी वापराचा ऐतिहासिक निर्णय यावर्षी घेतला. निश्चितच या अतिरिक्त 15 टीएमसी पाण्यामुळे राज्याला अंधार व भारनियमनातून दिलासा मिळाला आहे.

यावर्षी राज्यात कोळसा तुटवड्यामुळे वीजनिर्मिती समोर प्रचंड मोठे संकट उभे राहिल्याने महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती होती. त्यावेळी कोयनेवर भरवसा होता. पाणी वाटप लवाद, आरक्षण व ऐन उन्हाळ्यातील पाणीटंचाई याहीपेक्षा राज्य अंधारात जाऊ द्यायचे नाही या दृष्टिकोनातून कोयनेतून सरासरी पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करण्यात आली. याशिवाय एक जूनपासून सुरु होणार्‍या नव्या वर्षारंभाला धरणात अपेक्षित पाणीसाठा शिल्लक राहण्याच्या शक्यता असून 31 मे या तांत्रिक वर्षाखेरपर्यंत धरणातून विजेची व सिंचनाची अखंडीत निर्मिती होईल.

सप्टेंबर, ऑक्टोबर 2021 या कालावधीत व त्यानंतर काहीकाळ राज्यात अभूतपूर्व कोळसा टंचाई निर्माण झाली. त्यावेळी कोळशावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प बंद राहिल्याने त्यावेळची वीज समस्या लक्षात घेऊन कोयना जलविद्युत प्रकल्पात पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करण्यात आली होती. कोयना पश्चिम वीजनिर्मितीसाठी त्याकाळात कमालीचा पाणीवापर झाल्याने एप्रिल-मे महिन्यात पाण्याअभावी कोयना पश्चिम वीजनिर्मिती बंद पडण्याची शक्यता होती. वर्षभरात लवादाचा पश्चिम वीजनिर्मितीसाठी 67.50 टीएमसीचा कोटा लक्षात घेता त्याकाळात जादा पाणीवापर झाला होता. स्वभाविकच हा अतिरिक्त जादा पाणीवापर लक्षात घेऊन प्रशासनाने अतिरिक्त 15 टीएमसी पाणी वापरासाठी परवानगी मागितली होती. सुरुवातीला 30 मार्चला अतिरिक्त 10 टीएमसी व त्यानंतर 27 एप्रिलला 5.081 असे एकूण 15.081 टीएमसी अतिरिक्त पाणी पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. या अतिरिक्त पाणीवापरासाठी पहिल्यांदाच परवानगी मिळाल्याने चालूवर्षी अखंडित सिंचनासोबतच निम्म्याहून अधिक महाराष्ट्रातील विजेचा प्रश्न सोडवण्यात कोयना धरण प्रशासन, वीज पारेषण कंपनी व प्रशासनाला यश आले आहे. याशिवाय सध्याचा एकूण शिल्लक 28.27 टीएमसी पाणीसाठा लक्षात घेता यापैकी 31 मे पर्यंत पश्चिम वीजनिर्मितीसाठी आरक्षित 5.58, सिंचनासाठी सरासरी गरज असलेले 5 व मृतसाठा 5 अशा एकूण 15.58 टीएमसीचा विचार केला तरी एक जून पासून सुरु होणार्‍या नव्या वर्षारंभाला धरणात सरासरी 12 ते 15 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे.

कोयना 22 मे 2022
= पाणीसाठा : 28.27 टीएमसी
= पाणीउंची : 2173.2 फूट
= पश्चिम वीज पाणीवापर : 76.92 टीएमसी
= सिंचन पाणीवापर : 19. 52 टीएमसी

  • भारनियमनापासून आपत्कालीन काळातही संरक्षण
  • नव्या वर्षारंभाला अपेक्षित पाणीसाठा शिल्लक राहणार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news