नगरपरिषद सभांचे ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार

नगरपरिषद सभांचे ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार

कराड : अमोल चव्हाण

नगरपरिषदांच्या सर्वसाधारण सभांचे ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच केलेले रेकॉर्डिंग सात दिवसात नगरपरिषदेच्या व संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे, असा आदेश आयुक्त तथा नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक डॉ. किरण कुलकर्णी यांनी जिल्हाधिकार्‍यांसह मुख्याधिकार्‍यांना दिले आहेत. याबाबत मलकापूर नगरपरिषदेचे भाजपाचे आक्रमक नगरसेवक विक्रम अशोक चव्हाण उर्फ दिनेश रैनाक यांनी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

त्यामुळे यापुढे मलकापूरसह राज्यातील सर्व नगरपालिकांच्या सभांचे ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा मार्ग मोकळा झाला असून ते नागरिकांना सहज उपलब्ध होणार आहे. नगरपालिका कामकाजातील पारदर्शकता वाढण्यास योग्य प्रकारे मदत होणार असून नागरिकांनाही सभागृहातील कामकाजाची माहिती मिळणार आहे.

मलकापूर नगरपरिषदेच्या होणार्‍या सर्व सभा पारदर्शक होण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेच्या सभांचे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे अशी मागणी भाजपा नगरसेवक दिनेश रैनाक यांनी केली होती. मात्र त्यांच्या मागणीला सत्ताधार्‍यांनी प्रतिसाद दिला नव्हता. याबाबत नगरसेवक दिनेश रैनाक यांनी सभेतील चर्चा, प्रोसिडिंग यामधील तफावती वारंवार सभागृह, जनता व प्रशासनापुढे पुराव्यासह मांडल्या होत्या. तसेच याबाबत 12 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना लेखी पत्राद्वारे सभेचे ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची मागणी केली होती. तसेच दिनेश रैनाक यांनी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला होता.

त्यांच्या मागणीची दखल घेऊन राज्य शासनाने नगरपरिषदेच्या सर्व सभांचे ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे परिपत्रक 20 मे 2022 रोजी काढले. तसेच आयुक्त तथा नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक डॉ. किरण कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना नगरपरिषदेच्या सभांचे ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश देत केलेले रेकॉर्डिंग सात दिवसात नगरपरिषदेच्या व संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

नगरसेवकांच्या कार्यक्षमतेचे होणार मूल्यमापन

सध्या संसद विधिमंडळ कामकाजाचे थेट प्रक्षेपण होते. नागरिकांच्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या नागरी सुविधेशी संबंधित असणार्‍या नगरपालिकेसारख्या संस्थेचे कामकाजही लोकांसाठी खुले झाल्यामुळे लोकशाही मूल्यांकणांमध्ये वृध्दी होणार आहे. याशिवाय लोकप्रतिनिधी आपल्या वॉर्डतील प्रश्न सभागृहात मांडून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतात का? याची माहिती व नगरसेवकाच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापनही जनतेला थेट करता येणार आहे. या निर्णयाबाबत भाजपाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक दिनेश रैनाक यांनी वारंवार प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केल्याने विविध स्तरातील लोकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

नगरपरिषदेच्या सभांचे ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यामुळे खर्‍या अर्थाने नगरपरिषदेचे कामकाज नागरिकांसाठी खुले होण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी मागणी करूनही मलकापूरचे सत्ताधारी त्याला प्रतिसाद न देता हुकूमशाही पद्धतीने वागत होते. परंतु, आता सर्व सभांचे ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग करावेच लागेल.
– विक्रम अशोक चव्हाण उर्फ दिनेश रैनाक, भाजपा नगरसेवक, मलकापूर नगरपरिषद

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news