धोप तलवार, हैद्राबादी कट्यार, अरेबियन जांभिया; ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन ठरले आकर्षण

धोप तलवार, हैद्राबादी कट्यार, अरेबियन जांभिया; ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन ठरले आकर्षण
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  ऐन शिवजयंतीच्या धामधुमीमध्ये सातार्‍यातील प्रतापसिंह हायस्कूल येथे ऐतिहासिक वास्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात चौदाव्या शतकातील खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वस्तू पाहण्यासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. धोप तलवार, हैद्राबादी कट्यार, अरेबियन जांभिया अशी ऐतिहासिक शस्त्रे, दस्तावेज, तलवारी, बंदुका या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर अंगावर शहारे येत आहेत. हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी संग्रहालयात गर्दी होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सव समिती राजधानीच्यावतीने आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 17 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छ. प्रतापसिंह हायस्कूल येथे शुक्रवारपासून शस्त्र प्रदर्शन सुरू झाले. हत्तीवरून लढाई करताना वापरण्यात येणारे मोठ्या आकाराचे भाले म्हणजेच गजकुंत, घोड्यांवरून वापरण्यात येणारे अश्वकुंत तर जमिनीवरून लढाई करताना वापरले जाणारे पदकुंत, हैद्राबादी कट्यार, तलावारी, वाघनखे, ब्रिटिशकालीन ठासणीच्या बंदुका, नाणी, वेगवेगळ्या धातूच्या समई तसेच गडावरील दरवाजांची व वाड्यांची जुनी पोलादी कुलुपे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कुलपांना चावी असून ती आजही सुस्थितीत आहेत.

मुघलकालीन बारूददान

मुघल आणि ब्रिटिश काळात लढाईमध्ये ठासणीच्या बंदुकीची लागणार्‍या बारूद (दारू) च्या साठवण्यासाठी लागणार्‍या डबीला बारूददान असे म्हटले जायचे. बारूददान या प्रकारामध्ये मुघल कालीन बारूददान आणि ब्रिटिश कालीन बारूददान पहावयास मिळत. बारूददान हे प्राण्यांच्या शिंगापासून चांद्यापासून बनवलेले देखील आहेत. तांबे व पितळ धातूमध्ये देखील बारूददान पहावयास मिळत असून ब्रिटिश काळामध्ये याचा जास्त वापर झाला आहे.

प्रत्येक वस्तूला इतिहासाची किनार

राजधानी प्रदर्शनात तब्बल 1 हजार 300 वस्तू मांडण्यात आल्या आहेत. यात पोलादी खांडा, दांडपट्टा, माणसाच्या मिशीप्रमाणे पाते असणारी तबर म्हणजेच कुर्‍हाड, चंद्राकार तलवारी, हैद्राबादी कट्यार, अरेबियन पद्धतीचे लहान शस्त्र जांभिया, बोरुपासून बनवलेले बाण, बिचवा, खंजिरासारखे दिसणारे चिलानम, बारुददाण अशा वस्तूंचा समावेश आहे. प्रत्येक वस्तूला इतिहासाची किनार असून, या वस्तू नागरिकांसह इतिहासप्रेमींसाठी कुतुहलाचा विषय ठरला आहे.

17 व्या शतकातील ठासणीची बंदूक

प्रदर्शनात ब्रिटिशकालीन ठासणीच्या बंदुका आहेत. या 17 व्या आणि 18 व्या शतकातील ब्रिटिश काळातील अधिकार्‍याकडे आढळत होत्या. एका लाकडाच्या मुठीमध्ये बसवलेल्या अशा ठासणीच्या बंदुका आहेत. याची फायरिंग 5 रेंज मीटर ते 20 मीटर लांब एवढी आहे. काही ब्रिटिश पिस्टल या पितळी धातूमध्ये बनवलेल्या आहेत.

36 इंची नायर तलवार

या प्रदर्शनात चौदाव्या शतकातील नायर तलवार विशेष लक्षवेधी ठरली. भारतातील दाक्षिणात्य मंदिरांमधील रक्षकांच्या वापरातील दक्षिणी मुठीची ही तलवार दुधारी असते. तलवारीचे पुढचे पाते तीक्ष्ण असते. या तलवारीची लांबी साधारणपणे 30 ते 36 इंच इतकी असते.

धोप (मराठा) तलवार

धोप (मराठा) ही तलवार सरळ लांब पोलादी पात्याची असून तिचा वापर मराठा सैन्यातील नामांकित सरदार, सेनापती अथवा राजघराण्यातील व्यक्तीच वापर करत होते. या तलवारीच्या पात्यावर एक, दोन किंवा तीन नाळ आहेत. याची साधारण लांबी तीन ते साडेचार फूट इतकी आहे. या तलवारीच्या मुठीच्या हाताला संरक्षण होण्यासाठी परज असून मुठीला एक ते तीन इंच अशी शेंडी, गज आहे.

सुवर्ण नाणी

तांबे, सोने-चांदी या धातूंचा वापर हा या चलनासाठी केला आहे. 19 व्या शतकाच्या अखेरीला हे शिवराई चलन वापरात आले आहे. ऍबॉट नावाच्या ब्रिटिश अधिकार्‍याने 25 हजार शिवराई गोळा करून त्याचा अभ्यास देखील केला होता. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती श्री राजा शंभू हे चलन वापरात आणले.

जाळीदार चिलखत 8 किलोचे

प्रदर्शनात 17 व्या शतकातील जाळीदार चिलखत व जिरेटोप विशेष लक्षवेधी ठरला. एक पदरी प्रकारातील हे चिलखत लढाईत वापरण्यात आलेले आहे. या चिलखताचे वजन आठ किलो असून ते पोलादी धातूच्या कड्या कड्यांच्या वीणकामापासून बनवले आहे. जिरेटोपदेखील पोलादी धातूच्या जाड पत्र्यापासून बनवण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news