

मारुल हवेली; पुढारी वृत्तसेवा : तुमचे आजोबा शब्दाचे पक्के होते. त्यांनी कायम स्वतःचा स्वाभिमान अबाधित ठेवला. स्वतःचे मूल्याधिष्ठित राजकारण डागाळणार नाही, याची काळजी घेतली. पक्षनिष्ठा जपली. मात्र तुम्ही तुमच्या आजोबांच्या विचारांचे तरी झालात का? तुमच्या आजोबांचा विचार कळला का? असा सवाल उपस्थित करून तुम्ही तुमच्या आजोबांच्या नावाला कलंक लावला, असा जोरदार प्रहार शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आ. शंभूराज देसाई यांच्यावर केला.
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या मल्हारपेठ (ता. पाटण) येथे महाप्रबोधन यात्रेदरम्यान आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. सुषमा अंधारे यांनी आपल्या रोखठोक शैलीत बंडखोर आमदारांचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या, ज्या शिवसेनेने सहकार परिषदेचे अध्यक्षपद दिले, तीन वेळा आमदार केले, मंत्रिपदे दिली, त्या शिवसेनेला व नेत्यांना तुम्ही आव्हान देताय हे तुम्हाला शोभतंय का? जो शिवसेना आणि मातोश्रीवर हल्ला करेल, त्याचा शिवसैनिक चक्रवाढ व्याजासह परतावा करेल. दुर्बलावर ताकद आजमावायची सोडा. सभेला परवानगी मिळत नाही, पालकमंत्री शंभूराज देसाई तुम्हाला कशाचा भीती वाटते? चांगल्या कामासाठी तुम्ही तिकडे गेला आहात, तर तुम्ही चांगले काम केले पाहिजे. त्यासाठी दारूची दुकाने बंद झाली पाहिजेत. दारू दुकाने बंद करणारे खाते तुमच्याकडे आहे. मग ही दुकाने बंद करणार का, असा सवालही उपस्थित केला.
ज्या हिंदुत्वाच्या बाता मारताय, ते हिंदुत्व तरी तुम्हाला कळलंय का? आमची संख्या बेशक कमी आहे. मात्र ही संख्या खोक्याला बघून बदलणारी नाही. खोके खर्चूनसुद्धा असे निष्ठावंत सैनिक मिळणार नाहीत. तुम्हाला परराज्यातून सभेला माणसे बोलवावी लागतात. सभेची गर्दी दाखवण्यासाठी माणसे आणू शकाल, पण मतांच्या वेळी जनता तुमच्याकडे पाहून घेईल. आदित्य ठाकरेंना पाटणमधून लढण्याचे काय आव्हान देताय. त्या अगोदर येथील सत्यजितसिंह पाटणकर, हर्षद कदम व सर्वसामान्य शिवसैनकाशी दोन हात करा. येणार्या निवडणुकीत तुम्हाला गुलाल दिसणार नाही.