

तासवडे टोलनाका : प्रवीण माळी
गुंडगिरी, रिटर्न टोल न देणे यासह स्थानिकांच्या समस्या यामुळे सातत्याने चर्चेत असणार्या तासवडे टोलनाक्यावरील ठेकेदार कंपनी बदलली आहे. त्यामुळेच आता स्थानिकांना टोलनाक्यावर सवलत मिळणार का? याबाबत संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिकांककडून अन्याय झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे-बंगळूर महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर सन 2005 साली तासवडे गावानजीक टोलनाका सुरू करण्यात आला. संपूर्ण देशात 24 तासात परतीचा प्रवास करणार्या वाहनांना रिटर्न टोलची सवलत दिली जात होती. मात्र याला कराड तालुक्यातील तासवडे व कोल्हापूरजवळील किणी हे दोन टोलनाके अपवाद होते. टोलनाक्यावर अनेकदा गुंडगिरीही होत असल्याने काहीवेळा जोरदार मारामारी होत होती. याशिवाय टोलनाक्यावर स्वच्छतागृह नव्हते. अनेकदा आवाज उठवल्यानंतर तीन वर्षांपूर्वी स्वच्छतागृह बांधण्यात आले होते. याशिवाय महामार्गात जमिनी गेलेल्या स्थानिक शेतकर्यांसह सर्वसामान्य वाहन चालकांना सवलत दिली जात नव्हती. टोलनाक्याच्या अलीकडे वास्तव्यास असणार्या लोकांची पलीकडील बाजूस शेती असूनही टोल आकारणी केली जात असल्याने यापूर्वी अनेकदा आंदोलनही झाली होती.
उंब्रज परिसरातील नागरिकांसह परिसरातील वहागाव, वनवासमाची, खोडशी, तळबीड, बेलवडे हवेली, तासवडे, वराडे, घोणशी या गावातील स्थानिकांनी वारंवार आंदोलन केल्यानंतर टोलनाक्यावर स्थानिक वाहन चालकांना सवलत देण्यात आली होती. मात्र आता पुन्हा नवीन ठेकेदार कंपनीकडे टोलनाका हस्तांतरित झाला आहे. त्यामुळेच रिटर्न टोलसह स्थानिक वाहन चालकांसह शेतकर्यांना पूर्वीप्रमाणेच सवलत मिळणार का ? याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
तासवडे टोलनाक्यावर दुचाकी आणि रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र लेन ठेवण्यात आलेली नाही. मागील 22 वर्ष मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्ते विकास महामंडळाचे अधिकारीही कानाडोळा करतात. अनेकदा टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहावयास मिळतात. त्यामुळेच आतातरी यात सुधारणा होणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.