ढगफुटीची खा. श्रीनिवास पाटील यांच्याकडून पाहणी

ढगफुटीची खा. श्रीनिवास पाटील यांच्याकडून पाहणी
Published on
Updated on

कवठे ; पुढारी वृत्तसेवा : वाई तालुक्यातील कवठे गावात दि. 27 व 28 जुलै रोजी ढगफुटी झाली होती. यामुळे शेत व घरांमध्ये पाणी घुसून नुकसान झाले होते. ढगफुटीने हाहाकार उडाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर खा. श्रीनिवास पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील यांनी कवठे गावची पाहणी केली.

काही दिवसांपुर्वी ढगफुटी होऊन दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने लोकांच्या घरात पाणी शिरले होते. तर प्रवेशद्वारावर तब्बल 12 फूट पाणी साचले होते. यामुळे शेती व घरांचे नुकसान झाले. तसेच पुलाचे रखडल्याने नागरिकांना 5 ते 6 फूट उंच पाण्यातून मार्ग काढावा लागला. गावाचे प्रवेशद्वार बंद झाले होते, असे गार्‍हाणे नागरिकांनी मांडले.

राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम झाल्यानंतर रखडलेली कामे महामार्ग प्राधिकरणाने केली नाही. अशी तक्रार ग्रामस्थांनी केल्यानंतर खा. पाटील यांनी तत्काळ अधिकार्‍यांना फोन लावून खडे बोल सुनावले. तसेच या परिसराचा सर्व्हे करून रखडलेली कामे पुन्हा सुरू करावी, असेही सांगितले.

यावेळी खा. पाटील व नितीनकाकांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने तात्पुरती स्वरूपातील मिळावी म्हणून अधिकार्‍यांना सूचना केल्या. अधिकार्‍यांनीही युध्दपातळीवर कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.

दरम्यान, ढगफुटीमुळे शेती व घरांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे महसूल विभागामार्फत शेती व घरांच्या पंचनाम्यांचे काम सुरू आहे. कवठेचे तलाठी एस. एम. राठोड, एम. ए. जाधव, सतीश चव्हाण, राजेंद्र शितोळे, भरत मोरे, ग्रामसेवक राजेंद्र भोसले, भगवान डेरे यांची टीम नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामा करत आहे. या पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news