

खटाव, पुढारी वृत्तसेवा : जयकुमारजी, तुमची तब्बेत आणि शरीरयष्टी मजबूत आहे म्हणूनच भीषण अपघात होवूनही निभावलं. लवकर बरे व्हा, आपल्याला भरपूर काम करायचे आहे. डॉक्टर सांगतील त्या सुचनांनुसार विश्रांती घ्या, असा अधिकारवाणीचा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांना दिला.
भीषण अपघातात जखमी झालेले आ. गोरे गेल्या आठवडाभरापासून पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार घेत आहेत. मंगळवारी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आ. गोरे यांची भेट घेतली. रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांना शेजारी बसवून फडणवीस यांनी आ. गोरेंच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. अपघात कसा आणि कुठे झाला याची माहिती मी तात्काळ घेतली होती. जयकुमारजींची शरीरयष्टी मजबूत असल्यानेच भीषण अपघात होवूनही निभावलं आहे. आता डॉक्टर सांगतील त्या सुचनांनुसार विश्रांती घेऊन लवकर बरे व्हा. आपल्याला खूप काम करायचे आहे असेही फडणवीस यांनी सांगितले. यावेळी सोनिया गोरे, अंकुशभाऊ गोरे, अदित्य गोरे उपस्थित होते.
राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तब्बल दोन तास थांबून आ. गोरेंच्या प्रकृतीविषयी जाणून घेतले. काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा, असे सांगून त्यांनीही हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकार्यांशी चर्चा केली. भाजपा महिला आघाडीच्या राज्याध्यक्षा चित्राताई वाघ, माजी आमदार दिप्ती चौधरी, कल्याणभाऊ आखाडे, महिला मोर्चा सातारा जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले आणि जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी आ. गोरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.