चार मास्क लावल्याने तरूण गुदमरला; बेशुध्द झाल्याने थेट जिल्हा रूग्णालयात भरती

चार मास्क लावल्याने तरूण गुदमरला; बेशुध्द झाल्याने थेट जिल्हा रूग्णालयात भरती

Published on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सध्या कोरोनाची चौथी लाट सुरू झाली असून अनेकजण कोरोना बाधित आढळून येत आहेत. पूर्वीप्रमाणेच या चौथ्या लाटेचीही अनेकांनी धास्ती घेतली आहे. या धास्तीतूनच सातार्‍यात एक अजब प्रकार घडला असून कोरोना बाधित रुग्णाने एका पाठोपाठ चार मास्क लावल्याने त्याचा जीव गुदमरला. नातेवाईकांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने संबंधित रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोरोना होऊ नये म्हणून अनेकजण काळजी घेऊ लागले आहेत. मात्र अति काळजी ही जीव धोक्यात घालते. असाच काहीचा प्रकार सातार्‍यात समोर आला आहे. एका 24 वर्षीय तरुणाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तो इतका घाबरून गेला की, तो घरातून बाहेरच पडायचा बंद झाला. हवेतून विषाणू नाका- तोंडात जातील, या भीतीपोटी त्याने एका पाठोपाठ चार मास्क आपल्या तोंडाला लावले. काहीवेळ त्याला अस्वस्थ वाटले. मात्र, तरीसुद्धा त्याने मास्क काढले नाहीत. त्याची हालचाल अस्वस्थ झाल्याचे पाहून नातेवाईकांना काहीतरी वेगळं घडतंय, याची जाणीव झाली.

रूग्णाच्या भावाने तोंडावरील चारही मास्क काढले तेव्हा तो कोरोना बाधित तरुण बेशुद्ध अवस्थेत पडला होता. या प्रकारामुळे घरातील लोक गांगरून गेले. त्यांनी तातडीने त्या युवकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने उपचार करून त्याला शुद्धीवर आणले. मास्कमुळे पुरेसा ऑक्सिजन मिळाला नाही, असे निदान डॉक्टरांनी केले.कोरोनाची धास्ती घेतलेला हा पहिलाच रुग्ण या चौथ्या लाटेत आढळून आला. चार आणि पाच मास्क तोंडाला लावल्यानंतर आपल्याला श्वासही घेता येणार नाही इतकं साधं गणित असताना लोक स्वतःचा जीव का धोक्यात टाकतात तरी कसा? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news