साखरवाडी ; पुढारी वृत्तसेवा : खा. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार कोण आहे, हा चौकशीचा विषय आहे. ज्या पद्धतीचा हल्ला पवार कुटुंबीयांवर झाला तो निषेधार्ह आहे. या हल्ल्यामागे भाजपच्या कोणाचे षड्यंत्र जर निघाले तर मी राजीनामा देईन, अशा शब्दात खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.
खा. रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, हल्ल्यावेळी खा. सुप्रिया सुळे पुढे आल्या नसल्या तर कदाचित दुर्घटना देखील घडली असती. टीव्हीवर त्याचे चित्र पाहताना अंगावर काटा उभा राहत होता. अशा भ्याड हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो. समाजामध्ये काम करताना काही मतभेद होत असतात. काही कामे आज होतात, काही होत नाहीत.
पण एखाद्याच्या कुटुंबावर हल्ला करणे हा पर्याय नाही. तुम्हाला न्याय मागण्यासाठी न्यायालय, पोलिस ठाणे यासह अन्य पर्याय आहेत. एखाद्याचा निषेध करावयाचा असेल तर त्याला काळे झेंडे दाखवू शकता. पवारसाहेब व आम्ही किती जरी राजकीय विरोधक असलो तरी ते महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा आम्हाला आदर आहे. या हल्ल्यामागे निश्चित काही तरी षड्यंत्र आहे. कोण आहे ते चौकशीतून समोर येईल.
खा. रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, आगवणे अचानकपणे मीडियाला सामोरे गेले. त्यांनी जे पुरावे मांडण्याचा व मला ज्या पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न केला तो कट न्यायालयाने उधळवला. सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही. ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून हे प्रकरण सुरु आहे. याच्या पाठीमागे निश्चितच फलटण तालुक्यातील लोकप्रतिनिधींचा हात आहे. योग्य वेळ आल्यानंतर ते उघड करु. रामराजेसाहेबांची जुनीच सवय आहे, विरोधकाला बदनाम करायचे, पोलिसांमार्फत संपवायचे. याची मला सवय झाली आहे. या प्रकरणामध्ये माझ्या बाबतीत काही पुरावे असल्याशिवाय मी जास्त काही बोलत नाही, असेही ते म्हणाले. यावेळी अनुप शहा, जयकुमार शिंदे, वसीम इनामदार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.