‘काशिनाथाच्या नावानं चांगभलं’..लाखोंच्या उपस्थितीत बावधनचे बगाड

‘काशिनाथाच्या नावानं चांगभलं’..लाखोंच्या उपस्थितीत बावधनचे बगाड
Published on
Updated on

वाई; पुढारी वृत्तसेवा :  संपूर्ण राज्यात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाणारी बावधन (ता. वाई) येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा रविवारी 'काशीनाथाच्या नावानं चांगभलं' च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. कोरोनानंतर प्रथमच अपूर्व उत्साहात ही यात्रा साजरी झाली.

बगाडाचा प्रारंभ भाजपचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता करण्यात आला. कोरोनामुळे दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर भाविकांनी बगाडाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील कृष्णा नदीवर सोनेश्वर याठिकाणी सकाळी आठच्या सुमारास बगाड पोहोचले. त्यानंतर बगाड्या दिलीप शंकर दाभाडे यांना कृष्णा नदीत विधीवत स्नान घालण्यात आले. त्यानंतर देवदेवतांची विधिवत पूजा-आरती करण्यात आली. बगाड्याला वाजत-गाजत बगाडाजवळ नेवून त्याला पारंपरिक पद्धतीचा पोषाख घालून बगाडास टांगण्यात आले. यावेळी भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडास बांधले होते.
बगाडाचा गाडा ओढण्यास सकाळी साडेआकराच्या सुमारास सुरुवात झाली. त्यानंतर ठिकठिकाणी विसावा घेऊन बैल बदलण्यात आले. बगाडाबरोबर वाघजाईदेवी, भैरवनाथ आणि जोतिबाच्या पालख्यांचेही भाविकांनी दर्शन घेतले.

बगाड वाई-पाचवड रस्त्यावर दुपारी चार वाजले तरीही आलेले नव्हते. बावधन फाटयावर पाचच्या सुमारास पोहोचले.
बगाड गाड्यास शेतातून जाताना एकावेळी 12 बैल जुंपले होते. कच्च्या रस्त्यावर आल्यानंतर 4 बैल जुंपून बगाड ओढण्यात आले. गाडा गावाच्या दिशेने जात असताना ठिकठिकाणी शिडाच्या पाच फेर्‍या काढण्यात आल्या. बगाड परिसरात मुंबईच्या व स्थानिक विविध संस्था, मंडळांनी भाविकांच्या सोईसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. वाई व बावधन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक व 108 अ‍ॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आली होती. वाई विभागचे महावितरणचे उपअभियंता पंकज गोंजारी आपल्या टीम समवेत जातीने लक्ष ठेवून हजर होते.

वाई नगरपरिषदेचे अग्निशमक बंब बावधन हायस्कूल येथे सज्ज ठेवण्यात आले होते. सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बगाड गावात पोहचले. यावेळी वाद्यांचा गजर करण्यात आला. बगाड यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बगाड गाडयाच्या पुढे व पाठीमागे ट्रॅक्टरवर लाऊडस्पीकरची सोय करून कृषीभूषण शशिकांत पिसाळ, माजी सभापती दिलीप पिसाळ, राजू कदम, पोलिस पाटील अशोक भोसले, मदन भोसले, विलास पिसाळ, प्रतापराजे भोसले, विक्रम पिसाळ, आदी मान्यवर ध्वनीक्षेपकावरून बगाडाबाबत सुचना देत होते.

अनेक भाविकांनी दिलेल्या देणग्यांचा पुकारा यावेळी करण्यात येत होता. तसेच कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून भाविकांनाही सुचना देण्यात येत होत्या. पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे खराडे, वाईचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, उपनिरीक्षक कृष्णराज पवार, आशिष कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पीएसआय व 60 पोलिस कर्मचारी, एक जलद कृतीदलाची तुकडी तैनात होती.

खा. उदयनराजेेंचे 'काशिनाथा'ला साकडं

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी बगाडाचे मनोभावे दर्शन घेतले. बावधनचे ग्रामदैवत 'काशिनाथा'ला त्यांनी साकडं देखील घातलं. ते म्हणाले, या गावात यात्रेसाठी गावकरी एकत्र येतात. ही एकी कायम रहावी, लोकांचे भले होवो, उत्कर्ष होवो व सर्वजण सुखा-समाधानाने, आनंदाने राहोत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news