कराड : पालिका निवडणूक दुरंगी की बहुरंगी?

कराड : पालिका निवडणूक दुरंगी की बहुरंगी?

Published on

कराड : चंद्रजीत पाटील

मागील दोन ते तीन निवडणुकीतील कराड शहराचा इतिहास पाहता कोण कधी कोणासोबत आघाडी करेल ? आणि कोण कधी कोणाशी काडीमोड घेईल ? हे सांगता येत नाही, अशीच सध्यस्थिती आहे. मागील पाच वर्षांत जनशक्तीची 'दोन ते तीन' शकले उडाली आहेत. लोकशाही आघाडी सर्व शहरात सक्षम नाही. तर भाजपाने स्वबळावर पक्ष चिन्हावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केले असले तरी मर्यादित ताकद पाहता कराड पालिकेची निवडणूक दुरंगी होणार की बहुरंगी ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

राजकीय द़ृष्ट्या संवेदनशील असलेल्या कराड नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून प्रभाग निहाय आरक्षणही जाहीर झाले आहे. त्यानंतर आता संबंधित प्रभागातील इच्छुकांनी चाचपणीही सुरू केली आहे. तर ज्यांच्या प्रभागात अपेक्षित आरक्षण पडलेले नाही, अशा इच्छकांनी लगतच्या प्रभागात चाचपणी सुरू केली आहे.

एकीकडे अशी परिस्थिती असताना मागील साडेपाच वर्षांच्या कार्यकाळात बहुमत मिळवलेल्या जनशक्ती आघाडीचे अक्षरशः शकले उडाली आहेत. माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव आणि माजी उपनगराध्यक्ष जयंवत पाटील यांनी सवतेसुभे मांडले आहेत. मागील निवडणुकीनंतर जयवंत पाटील यांनी यादव गटाला साथ देत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी फारकत घेतली होती. मात्र, मागील एक ते दीड वर्षापासून जयवंत पाटील यांच्यासह त्यांचे समर्थक युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. अनेक कार्यक्रमात दोन्ही गटांचे समर्थक एकत्ररित्या पहावयास मिळाले आहेत.

एकीकडे अशी परिस्थिती असताना विरोधी लोकशाही आघाडी सर्व शक्यता लक्षात घेत मागील निवडणुकीवेळी आलेल्या अनुभवामुळे स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. मात्र, असे असले तरी बहुमत मिळवण्यासाठी लोकशाही आघाडीला दुसर्‍या एका गटाची मदत लागेल, अशी परिस्थिती आहे.

राजेंद्रसिंह यादव आमदार पृथ्वीराज चव्हाण गटासोबत जाणे सध्यस्थितीत अवघड वाटत आहे. त्यामुळेच यादव गट 2011 साली झालेल्या निवडणुकीप्रमाणेच पुन्हा एकदा लोकशाही आघाडीसोबत जाणार का ? हा प्रश्न आहे. याशिवाय भाजपाने यापूर्वीच स्वबळावर आणि पक्ष चिन्हावर लढण्याची घोषणा केली आहे.

राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पक्ष चिन्हावर लढण्याची आग्रही मागणी केली आहे. तसेच निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळेच आता आगामी निवडणुकीत कोण – कोणासोबत आघाडी करणार ? कोण कोणास विरोध करणार ? यासह पालिका निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी ? याबाबत तर्कविर्तक सुरू झाले आहेत.

तालुक्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम

कराड दक्षिणेत काँग्रेसचे प्राबल्य आहे. तर कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. यंदा नगरपालिकेसह बाजार समिती, जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणूक होणार आहे. बाजार समिती आणि जिल्हा परिषद – पंचायत समितीत काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होणार आहे. याचेही पडसाद पालिका निवडणुकीवर उमटण्याची चिन्हे आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news