कराड नगरपालिका : चूक प्रशासनाची…मनस्ताप मतदारांना

कराड नगरपालिका : चूक प्रशासनाची…मनस्ताप मतदारांना
Published on
Updated on

कराड ; प्रतिभा राजे : कराड नगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये अनेक घोळ असून एका प्रभागातील मतदारांची नावे दुसर्‍याच प्रभागात गेल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे मतदारांना मनस्ताप झाला असून हरकती दाखल करण्यास दोन दिवस पुरेसे नाहीत. मतदार यादीतील हा घोळ कायम राहिला, तर अनेक मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागणार आहे. बीएलओ (बुथ लेव्हल ऑफिसर) यांनी यादी व नावांची तपासणी न करताच याद्या तयार केल्या ने त्याचा फटका मतदारांना बसला आहे. दरम्यान, या मतदार याद्या तयार करताना राजकीय हस्तक्षेप झाल्याचाही आरोपही होत आहे.

27 जूनपर्यंत मतदार यादीबाबत हरकती दाखल करता येणार असून पालिकेमध्ये काही हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. मतदार यादींमध्ये प्रचंड गोंधळ व चुका असल्याने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी हरकतींवर दुरूस्ती करण्यासाठी 8 सुपरवायझरची नेमणूक केली आहे. मात्र असे असले तरी या याद्या एवढ्या कमी कालावधीत दुरूस्त करणे शक्य आहे का ? असा प्रश्‍न आहे. बीएलओंनी काम करताना नावांची, मतदार याद्यांची खातरजमा केली नाही. त्यामुळे एखाद्या प्रभागातील आख्खे ब्लॉक दुसर्‍या प्रभागामध्ये गेले आहेत. प्रभाग नऊमधील यादीमध्ये तर सर्वच घोळ निर्माण झाला आहे. प्रत्येक प्रभागामध्ये किमान 3 हजार मतदारांची नावे आहेत. या यादीत व इतर प्रभागातील यादीत स्वत:चे नाव शोधणे मतदारांची डोकेदुखी झाली आहे.

प्रभाग क्र. 1 मध्ये प्रभाग क्र. 15 मधील नावे समाविष्ठ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रभाग क्र. 14 मध्यही हाच घोळ झाला आहे. तर प्रभाग क्र. 15 मधीलही इतर प्रभागात समाविष्ठ झाली आहेत. प्रभाग क्र. 1, 4, 5,6, 9, 13 या प्रभागातही असेच घोळ झाले आहेत. काही प्रभागामध्ये संपूर्ण ब्लॉकमधील नावे दुसर्‍या प्रभागात समाविष्ठ झाली आहेत. काही प्रभागातील शेवटच्या काही भागातील मतदार शेजारच्या प्रभागामध्ये समाविष्ठ झाली आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आतापर्यंत पालिकेत 72 हरकती दाखल झाल्या आहेत. हरकती दाखल करण्यास मुदत वाढ मिळाली नाही, तर ही नावे दुरूस्त करता येणार नाहीत.

नाव शोधताना मतदारांची कसरत

मतदार यादीत स्वत:चे नाव शोधणे ही अत्यंत क्‍लिष्ट प्र्रक्रिया आहे. उदाहरणार्थ, एखाद्या मतदाराचे नाव त्याच्या प्रभागाच्या यादीमध्ये नसेल, तर त्या मतदाराला लगतच्या सर्व मतदार यादीमध्ये नावे शोधावे लागते. त्या ठिकाणी नाव नसेल तर उरलेल्या सर्वच मतदार याद्यांमध्ये स्वत:चे नाव शोधावे लागत असल्याने मतदारांना याचा प्रचंड मनस्ताप होत आहे.

जागरूक नसणार्‍या मतदारांच्या नावाचे काय ?

सुशिक्षित मतदार मतदार याद्यांबाबत जागरूक आहेत. मात्र शहरातील अशिक्षित, झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक हरकती दाखल करणार का ? या मतदारांना माहिती नसल्याने ही नावे चुकीच्या पध्दतीने इतर प्रभागात गेली आहेत. प्रशासनाला होम टू होम जाणे व मतदार यादी तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी नाही. त्यामुळे निवडणुकीत उमेदवारांसह संबंधित मतदारांना मोठा त्रास सहन करावा लागणार अशीच चिन्हे आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news