

रेठरे बु॥ ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात नुकतेच पुन्हा भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यामुळे, आता येणार्या अडीच वर्षात कराड दक्षिणचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचा कसोशीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत जलजीवन मिशनअंतर्गत वाठार गावासाठी मंजूर झालेल्या 5.50 कोटी रुपयांच्या 24 बाय 7 नळपाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी रोजगार हमी योजनेअंतर्गत रेठरे-वाठार शिव पाणंद रस्ता (13 लाख 58 हजार), मालखेड-वाठार शिव पाणंद रस्ता (13 लाख 24 हजार), इनाम पाणंद रस्ता (7 लाख 30 हजार) अशा एकूण 34 लाख रुपयांच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सरपंच सौ. शोभाताई पाटील, कारखान्याचे संचालक दत्तात्रय देसाई, कृष्णा बॅकेचे संचालक प्रमोद पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष पै. धनाजी पाटील, जि.प. सदस्य गणपतराव हुलवान, उपसरपंच सचिन पाटील, जयवंतराव भोसले पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, पांडुरंग पाटील, ओबीसी मोर्चाजिल्हाध्यक्ष सुरेश शिंदे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास रेठरे खुर्द सोसायटीचे अध्यक्ष संदीप साळुंखे, मालखेडचे सरंपच युवराज पवार, सोसायटी चेअरमन बाजीराव माने, देवानंद पाटील, सदाशिव भोसले, हर्षवर्धन मोहिते, धनाजी जाधव, उत्तम पाटील, ग्रामस्थ, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. आभार माजी उपसरपंच आभिजित मोरे यांनी मानले.