

कराड : पुढारी वृत्तसेवा
कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांची अवघ्या नऊ महिन्यातच पदोन्नतीवर बदली झाली आहे. ते वर्धा येथे हजरही झाले. मात्र बुधवारी सहाव्या दिवसा अखेर कराडला पूर्णवेळ गटविकास अधिकारी हजर झालेले नाहीत. कराडला येण्यासाठी शाहूवाडीचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे व पाटणच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे इच्छुक आहेत. मात्र अद्याप कोणाची वर्णी लागलेली नाही.
डॉ. आबासाहेब पवार यांची बदली झाल्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये कराड पंचायत समितीचा पदभार शशिकांत शिंदे यांनी स्वीकारला. केवळ नऊ महिन्यात त्यांची पदोन्नतीवर वर्धा येथे बदली झाली आहे. शुक्रवार दि. 27 रोजी ते वर्धा येथे हजरही झाले आहेत. त्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या कराड पंचायत समितीचा प्रभारी पदभार खटावचे गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे यांच्याकडे देण्यात आला आहे.
कराडला कोण हजर होणार याबाबत पंचायत समितीत वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू आहे. पाटणच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे व गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र बुधवार अखेर अद्याप कोणाचीही वर्णी लागलेली नव्हती. कराडला काम करण्यासाठी अधिकारी नेहमीच उत्सूक असतात. मीना साळुंखे व अनिल वाघमारे दोघांचेही प्रयत्न सुरू आहेत.
सध्यातरी खटावचे गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे हेच प्रभारी म्हणून काम पहात आहेत. पदाधिकार्यांचा कार्यकाल संपला आहे. गटविकास अधिकारी प्रशासक म्हणून काम पहात आहेत. सध्या तेही पूर्णवेळ नसल्याचे प्रशासकीय कामकाज विस्कळीत झाले आहे.
कराड पंचायत समिती पदाधिकार्यांचा कार्यकाल संपल्याने पंचायत समितीवर प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी काम पहात आहेत. पण आता त्यांचीही बदली झाल्याने प्रभारी अधिकार्यांमार्फत पंचायत समितीचा गाडा हाकला जात आहे. तालुक्याचा विस्तार मोठा आहे. दोन विधानसभा मतदार संघाचा यामध्ये समावेश असल्याने कामाचा व्याप मोठा आहे. पूर्णवेळ अधिकारी नसल्याने कार्यालयीन कामकाज विस्कळीत झाले आहे.