

तळमावले : पुढारी वृत्तसेवा
आषाढी वारीचे औचित्य साधून डाकेवाडी (काळगाव) ता. पाटण येथील अक्षर वारकरी डॉ. संदीप डाकवे यांनी 34 सेमी बाय 20 सेमी या आकाराच्या एका पानावर संपूर्ण हरिपाठ लिहण्याचा प्रयत्न केला आहे. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्त्वाचे स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाचे अभंग रचलेले आहेत.
डॉ. संदीप डाकवे हे गेले काही वर्षापासून आषाढी वारीचे औचित्य साधून एक वेगळा, नावीन्यपूर्ण कलात्मक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. यंदाचे वारीचे औचित्य साधून त्यांनी एका पानावर हरिपाठ लिहिला आहे. यापूर्वी डॉ. डाकवे यांनी टी शर्टवर विठूरायाचे चित्र, मोरपिसावर संत तुकारामांचे चित्र, शब्दात विठ्ठलाच्या चित्रांचे रेखाटन, 16 फूट बाय 2 फूट आकाराच्या पोस्टरातून वारकर्यांना शुभेच्छा, वारीचे भव्यदिव्य चित्र, अक्षर अभंग वारी उपक्रम असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.