आजपासून ‘उदे गं अंबे उदे’

आजपासून ‘उदे गं अंबे उदे’

Published on

सातारा;  पुढारी वृत्तसेवा :  आदिशक्ती दुर्गामातेच्या नवरात्रौत्सवास सोमवार, दि. 26 सप्टेंबरपासून प्रारंभ होत असून आता सलग नऊ दिवस 'उदे गं अंबे उदे'चा जागर होणार आहे. दरम्यान, नवरात्रौत्सवासाठी ऐतिहासिक शाहूनगरी सज्ज झाली असून पूर्वसंध्येला शहर व परिसरातील बाजारपेठेत या उत्सवाचाच माहोल राहिला. पूजा साहित्य खरेदीसाठी महिला व नागरिकांची तोबा गर्दी झाली.

दु:ख आणि नैराश्याचे मळभ दूर करून मांगल्याची चाहूल घेऊन नवरात्रौत्सवास सोमवारपासून सुरुवात होत आहे. तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे अवघ्या जनजीवनामध्ये नवरात्रौत्सव व दुर्गादेवीच्या आगमनाची आतुरता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी शहर व परिसरातील बाजारपेठेत घटस्थापनेसाठी लागणारे पूजा साहित्य तसेच घटाभोवती टाकावयाचे पाच प्रकारचे धान्याचे पॅकिंग, नाडापुडी, घट आदी साहित्य खरेदीसाठी महिला व नागरिकांची गर्दी झाली होती. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत फुले, मिठाई खरेदीसाठी गर्दी झाली होती. देवीच्या पूजेसाठी हार, गजरे, वेण्या बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या असून त्याला वाढती मागणी आहे. मिठाईची दुकानेही गर्दीने फुलून गेली आहेत. देवीसाठी दागिने तसेच सजावटीच्या वस्तूंनाही बाजारपेठेत वाढती मागणी आहे. पारंपरिक दागिन्यांसह नवीन आकर्षक दागिनेही बाजारपेठेत आले आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त घरोघरी महिला व नागरिक उपवास करत असतात. त्यामुळे शहर परिसरातील बाजारपेठेत देशी फळांसह परदेशी फळे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली असून फळांचे भावही वधारले आहेत.

नवरात्र उत्सवानिमित्त प्रतापगड येथील भवानी मंदिर, मांढरदेव येथील काळूबाई, जलमंदिर येथील भवानीमाता, पार येथील श्रीराम वरदायिनी, औंध येथील यमाईदेवी, किन्हई येथील साखरगड निवासिनी, देऊर येथील मुधाईदेवी, आसले येथील भवानी माता, माण येथील कुळकजाई, अजिंक्यतारा येथील भवानी देवी, कुसूंबी येथील काळेश्वरी, आरळे येथील वडजाईदेवी, काशीळ येथील म्हाकूबाई, आसवली येथील जानुबाई, अजिंक्यतारा किल्ल्यावरील मंगळाई देवी, भुईंज येथील महालक्ष्मी, पिंपोडे येथील घुमाईदेवी, वाठार किरोली येथील यमाईदेवी, शाहूपुरी येथील वैष्णवदेवी, देवी चौक येथील महाकाली देवी, पिंगळी येथील पिंगळजाई, खटाव येथील अंबाबाई, कराड येथील कृष्णामाई, दैत्यनिवारणी देवी यासह देवींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विविध शाळा, महाविद्यालये, संस्थांतर्फे शारदीय व्याख्यानमाला, चर्चासत्र व प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

असा आहे घटस्थापना मुहूर्त…

हिंदू धर्मातील शारदीय नवरात्रोत्सवात घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे. मातीचा घट म्हणजे देवता, ग्रह आणि नक्षत्रांचे निवासस्थान मानले जाते. सुख-समृद्धी व शुभ कार्याचे प्रतीक म्हणून नवरात्रीमध्ये कलशाची स्थापना करून सर्व दैवी शक्तींचे आवाहन केले जाते. यावर्षी घटस्थापनेसाठी दिवसभरच शुभकाळ आहे. सकाळी 6.28 ते रात्री 8.10 वा. पर्यंत मुहूर्त आहे. तसेच यावर्षी शारदीय नवरात्रोत्सव शुक्ल आणि ब्रह्मयोगाचा संगम होत आहे. सोमवार दि. 3 ऑक्टोबर रोजी महाष्टमी, मंगळवार दि. 4 ऑक्टोबर रोजी नवमी तर दि. बुधवार दि. 5 रोजी विजयादशमी साजरी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news