अजिंक्यतार्‍यावर रोप-वेसाठी 92 कोटी : खा. उदयनराजे

अजिंक्यतार्‍यावर रोप-वेसाठी 92 कोटी : खा. उदयनराजे
Published on
Updated on

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : किल्‍ले अजिंक्यतार्‍यावरील मंगळाईदेवी परिसर ते किल्ल्याच्या पूर्व भागाकडील खालची मंगळाई या हवाई मार्गावर रोप-वे उभारण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. एकूण 92 कोटी रुपयांच्या या केबल रोप-वे प्रकल्पाची उभारणी केंद्राच्या निधीमधून करण्यात येईल, अशी ग्वाही भुपृष्ठ व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली असून नगरपरिषदेमार्फत अजिंक्यतारा येथील या रोप-वेच्या उभारणीस सुरुवात होईल, अशी माहिती खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली.

डबल केबलद्वारे या दोन्ही ठिकाणांच्या परिसरात एकाच वेळी दोन्ही बाजूंकडून आठ आसन क्षमतेच्या दोन रोप-वे ट्रॉलीचे आगमन-निर्गमन होणार आहे. त्याकरिता आवश्यक जागा उपलब्ध होत आहे. नवी दिल्‍ली येथे खा. उदयनराजे भोसले यांनी मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन अजिंक्यतारा येथे उभारण्यात येणार्‍या रोप वेबाबत विस्तृत चर्चा केली. त्याप्रसंगी मंत्री गडकरी यांनी ही ग्वाही दिली.

किल्‍ले अजिंक्यतारा या ऐतिहासिक वास्तूला फार मोठा इतिहास लाभलेला आहे. याच किल्ल्यावर युगपुरुष छ. शिवाजी महाराज यांचे काही काळ वास्तव्य होते. या किल्ल्यावर सुमारे सात तळी असून या तळ्यातील झर्‍यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न पर्यावरण विभाग आणि इतिहासप्रेमींच्या मदतीने केला जाणार आहे, असेही खा. उदयनराजे यांनी सांगितले.

अजिंक्यतारा किल्ल्यावर श्री मंगळाईदेवी मंदिर आणि दक्षिणाभिमुखी मारुतीचे मंदिर अनेक भाविकांचे श्रध्दास्थान आहे. सुमारे 70 एकरापेक्षा जास्त भुभाग या किल्ल्याला लाभला आहे. इतिहासाचा साक्षीदार असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याचा सातारकरांना अभिमान आहे. या किल्ल्यावरच छ. राजाराम महाराज यांनी रायगडावरुन स्वराज्याची राजधानी स्थलांतरीत केली होती. जाज्वल्य इतिहास असलेल्या आणि ऐतिहासिक पाउलखुणा उमटलेल्या या किल्ल्यावर आजही हजारो व्यक्‍ती, इतिहासप्रेमी, शिवप्रेमी आणि भाविक नेहमीच भेट देत असतात. नवरात्रातील सर्व दिवस मंगळाईच्या दर्शनाला नेहमीच गर्दी होत असते.

किल्ल्याच्या दरवाजापासून थोडीशी चढण आणि पायर्‍या असल्याने वयस्कर नागरिकांना आजही किल्ल्यावर जाता येत नाही. केबल रोप वे मुळे या सर्वांना कमी वेळेत आणि कमी श्रमात तेथे जाता येईल. इतिहास तज्ज्ञांशी विचार करुन येथे ऐतिहासिक पर्यटन सुरु करण्याच्या कार्याला रोप-वे मुळे गती मिळणार आहे, असेही खा. उदयनराजे यांनी सांगितले.

मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा शहरातील किल्‍ले अजिंक्यतारावर रोप-वे ची उभारणी केंद्राच्या या निधीमधून करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही लवकरच केली जाईल, अशी ग्वाही देखील ना.नितिन गडकरी यांनी दिल्याचे खा. उदयनराजे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news