कराड  : ऑलिंपिकवीर स्व. खाशाबा जाधव आयलँडजवळील रस्त्याची अशी दुरवस्था आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते. (छाया : युवराज मस्के)
कराड : ऑलिंपिकवीर स्व. खाशाबा जाधव आयलँडजवळील रस्त्याची अशी दुरवस्था आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते. (छाया : युवराज मस्के)

अगोदर केला रस्ता अन् नंतर गटारे; पालिकेच्या अजब कारभारामुळे प्रभाग 14 मधील निम्मी घरे पाण्यात

Published on

कराड पुढारी वृत्तसेवा : उर्दू शाळेपासून ते भेदा चौकातील रस्त्याची झालेली चाळण, प्रचंड वाहतुकीमुळे उडणारी धूळ व त्यापासून होणारे प्रदुषण, सरकारी धान्य गोडावूनच्या कोपर्‍यात असणारे कचर्‍याचे ढीग, स्वच्छतागृहांची वाणवा, त्यामुळे होणारा दुर्गंधीचा त्रास तसेच तसेच तहसीलदार निवासस्थान ते मार्केट यार्ड गेट न. 1 व पुढे मार्केट यार्ड च्या भिंती लगतचे अतिक्रमण, खासगी वाहनांची मनमानी, खड्ड्यांमुळे होणारे छोटे मोठे अपघात असा प्रवास पुर्वीचा प्रभाग क्र. 12 पुर्नरचनेनंतर झालेला नवीन प्रभाग क्र. 14 चा आहे. या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे आधी गटारे व नंतर रस्ता करणे गरजेचे असताना याठिकाणी आधी रस्ता व नंतर गटारे केली. यामुळे नागरिकांना पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याठिकाणच्या अनेक कॉलन्या पावसाळ्यात पाण्यात असतात.

शासकीय गोडाऊन, सर्व्हे नं. 601 परिसर, मार्केट यार्ड, कार्वे नाका परिसर, नवीन पोलिास वसाहत, पाण्याची टाकी, बनपूरी कॉलनी, बैलबाजार, अजंठा पोल्ट्री परिसर, त्रिमुर्ती कॉलनी, श्रीरामनगर कॉलनीचा नवीन 14 प्रभागामध्ये समावेश आहे. गेल्या 40 वर्षापासून सरकारी धान्य गोडावूनच्या पाठीमागे असणारी वसाहत मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. या वसाहतीतील मतदारांचा मतापुरता विचार केला जातो. परंतु सुविधांबाबत त्यांचा विचार केला जात नसल्याच्या संतप्‍त प्रतिक्रिया या नागरिकांनी दिल्या आहेत. त्यांच्याकडे स्वच्छतागृहे नाहीत. पालिकेचे स्वच्छता अभियान याठिकाणी पोहोचत नाही. पावसाळ्यात ही वसाहत गुडघाभर पाण्यात असते. गटारी नसल्याने पाणी वाहून जाण्यास अडचणी येत आहेत. याबाबत अनेकदा पालिकेला नागरिकांनी सांगितले आहे. मात्र गटारांची सुविधा झाली नाही. याबाबत नागरिकांमधून संताप व्यक्‍त होत आहे.

रस्त्यांची दुर्दशा झाल्यावर वारंवार निवेदने देवून नागरिकांनी रस्त्यात फलके लावून निषेध केला. त्यानंतर रस्ता झाला. परंतु शहरातील इतर रस्त्यांप्रमाणेच या रस्त्यालाही दर्जा राहिला नाही. काही महिन्यातच रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरूवात झाली. रस्ते करण्याआधी याठिकाणी गटारे करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र रस्ता आधी केला त्यामुळे गटारी निमुळती झाली आहेत. आता पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे मैत्रीपार्क, संभाजी नगर, पवार कॉलनी, अजंठा पोल्ट्रीफॉर्म येथे गटारांची वाणवा आहे. याठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाळ्यात पाणी साचून राहते. गेट नं. 1 च्या शेजारी काही नागरिक उघड्यावर शौचविधी करत असल्याने याठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांनी संतप्‍त प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या आहेत. त्यामुळे या भागात सार्वजनिक स्वच्छतागृहाची गरज असल्याचे नागरिक सांगतात. या भागाला न्याय देणार्‍या, सर्वसामान्यांपैकी इच्छुकालाच मते देणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

कराडच्या बाहेर जाण्यासाठी मोकळ्या त्रिकोणी मैदानाला वळसा घालावा लागतो त्या वळणावरच मोठे खड्डे पडल्याने अपघातास निमंंत्रण मिळत आहे. स्व. पी. डी. पाटील गार्डन अजूनही डेव्हलप करता येवू शकते. मात्र याकडेही फारसे लक्ष दिले नाही. तसेच कल्याणी कॉलनीमध्ये असणारे ओपण स्पेसही डेव्हलप करता येवू शकते. याठिकाणीही पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे. भेदा चौकातील सिग्‍नलवर सीसीटिव्ही बसवण्यात येणार आहेत. मात्र ते करण्यापूर्वी प्रशासनाने याबाबत जनजागृती करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्‍त केल्या असून याठिकाणी झेब्रा क्रॉसिंगची मागणी करण्यात आली आहे.

दत्त चौक ते मार्केट यार्ड गेट नं. 1 ते बैल बाजार रस्ता शहराच्या हद्दी पर्यंतचा रस्ता शासनाने 100 फुट केला होता. मात्र सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे यांच्या प्रयत्नामुळे अनेक बाधितांची घरे वाचली. प्रभागातील खाशाबा जाधव आयलँडचीही स्वच्छता होत नाही. याकडेही पालिका दुर्लक्ष करत आहे. याठिकाणचा रस्ता अत्यंत खराब आहे. प्रभागातील नागरिकांशी संपर्क ठेवणारा व समस्यांची जाण असणारा नगरसेवक असावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्‍त केल्या आहेत.

रस्ता केला असला तरी या रस्त्याची दुरवस्था काही दिवसांतच झाली आहे. मोठे खड्डे पडले असून दर्जेदार रस्ते झाले नसल्याने ही दुरवस्था झाली आहे. गटारे केली नसल्याने याठिकाणच्या कॉलन्या नेहमी पाण्यात असतात. पालिकेने याचा विचार करावा. येत्या दोन दिवसात जर कामकाजाला सुरुवात झाली नाही तर नागरिकांना सोबत घेऊन आम्ही रास्ता रोको करणार आहे.
— इंद्रजित भोपते, नागरिक

रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा
गेट नं. 1 पासून कार्वेनाका रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे काढणे गरजेचे आहे. या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. ही अतिक्रमणे काढली तर वाहनांना अडथळा होणार नाही. मुळातच हा रस्ता अत्यंत खराब आहे. त्यातच रस्त्याकडेला अतिक्रमणे असल्याने वाहनधारकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

  • मैत्रीपार्क, पवार कॉलनीत निमुळती गटारे
  • गेट नं. 1 परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य
  • दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news