Satara Woman Police: 'बाय ऑल ऑफ यू' स्‍टेटस्‌ ठेवत महिला पोलिसाचा जीवन संपवण्याचा प्रयत्‍न

सातारा दलात खळबळ : 'खाकी'ने फसवल्‍याचा आरोप करत उचलले टोकाचे पाऊल
Satara Woman Police: 'बाय ऑल ऑफ यू' स्‍टेटस्‌ ठेवत महिला पोलिसाचा जीवन संपवण्याचा प्रयत्‍न
Published on
Updated on

सातारा : जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी असणार्‍या पोलिस दलातील एका महिला पोलिसाला स्वतःचा जीव संपवण्याची वेळ आली. व्‍हॉटस्ॲ‌पवर 'बाय ऑल ऑफ यू. माझं काही चुकले असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा,' असा स्‍टेटस्‌ ठेवून आत्‍महत्‍येच्या प्रयत्‍नात असतानाच त्‍या महिलेला वाचवण्यात यश आले. एका पोलिसानेच तिला फसवल्‍याने त्‍यातून टोकाचे पाऊल उचलल्‍याचे समोर येत आहे.

सातारा पोलिस दलातील ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. संबंधित पीडित महिला पोलिस कर्मचाऱ्याने तिच्या मोबाईलवर आत्‍महत्‍या करणार असल्‍याबाबतचा व्हॉटस्‌ॲप स्टेटस्‌ ठेवला. तो पोलिसाने पाहिल्‍यानंतर त्‍यांनी तत्‍काळ पोलिस ठाण्याच्या कारभार्‍यांना सांगितले. आक्रित घडणार या घटनेने तत्‍काळ पोलिसांचे पथक संबंधित महिला पोलिसाच्या घरी पाठवले. पोलिस कर्मचारी तिच्या खोलीवर पोहोचले तेव्हा तिने गळफास घेण्याची तयारी केली होती. त्‍यावेळी पोलिस पथकाने तातडीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि तिला गळफास घेण्यापासून परावृत्त केले. पोलिसांच्या या समयसूचकतेमुळे अनर्थ अगदी काही सेकंदांच्या फरकाने टळला.

यानंतर संबंधित महिला पोलिसाला धीर देवून तिचे समूपदेशन केले. महिला पोलिसाच्या कुटुंबीयांना तत्‍काळ तेथे बोलवले. असे कृत्‍य करण्याचे नेमके कारण विचारल्‍यानंतर तिने रडत रडत तिच्यासोबत घडलेला भयानक प्रकार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सांगितला. एका पोलिसानेच त्‍या महिला पोलिसाला लग्नाचे खोटे आमिष दाखवले. त्‍यातून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. याच छळाला कंटाळून आणि समाजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीने तिने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

महिला पोलिसाने केलेल्‍या या कृत्‍याबाबतचा अहवाल तयार करुन तत्‍काळ पोलिस अधीक्षक कार्यालयात याबाबतची माहिती दिली. संबंधित महिला पोलिस सावरत असून, तिने तक्रार दिल्‍यास त्‍या पोलिसाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला जाणार असल्‍याचे पोलिस अधिकार्‍यांनी बोलताना सांगितले. संबंधित पोलिस माेबाईल बंद करून पसार झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news