

सातारा : सातारा जिल्ह्यातील पवनचक्क्यांमधून तांब्याची तार असलेल्या केबल वायर चोरणार्या टोळीला जेरबंद करून पोलिसांनी 5 गुन्हे उघडकीस आणले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कारवाईत 18 लाख 80 हजार 14 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार संशयितांना अटक केली आहे.
सारीश संजय सावळवाडे (वय 23, रा. आगाशिवनगर, ता. कराड, (मूळ रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली), दत्तात्रय जगन्नाथ झोरे (वय 19, रा. सडावाघापुर, ता. पाटण), नीलेश श्रीमंत सूर्यवंशी (वय 27, रा. पाबळवाडी, ता. पाटण), प्रमोद सुरेश निकम (वय 26, रा. मसूर, ता. कराड) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये पाटण पोलिस ठाणे, सातारा तालुका पोलिस ठाणे, उंब्रज पोलिस ठाणे येथील गुन्हे आहेत. पोलिसांनी संशयितांकडून केबल वायर व मशीन, टेम्पो, वजनकाटा असा मुद्देमाल जप्त केला आहे.
सडावाघापूर व सडादाडोली परिसरातील पवनचक्क्यांमधील तांब्याच्या तारा असलेल्या केबल चोरीस गेल्याच्या तक्रारी पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. दि. 14 डिसेंबर रोजी पोलिस पथकाने पाटण, मसूर व कराड परिसरातून काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सडावाघापूर, दाडोली, राजापुरी, पाडेकरवाडी, घाटेवाडी, मालोशी, बामणेवाडी व भांबे या परिसरातील पवनचक्क्यांमधून केबल वायर चोरी केल्याची कबुली दिली.