Satara drug case : ड्रग्ज प्रकरणातील ओंकार डिगे फरारच

मुंबई व मेढा पोलिसांकडून कसून शोध : पावशेवाडीतील घराची झाडाझडती
Satara drug factory
Satara drug factoryPudhari News Network
Published on
Updated on

बामणोली : सावरी (ता. जावली) गावच्या हद्दीमध्ये सुरू असलेली ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त केल्यानंतर हे प्रकरण ज्याच्याभोवती घोंघावत आहे तो ओंकार (काळू) तुकाराम डिगे (रा. पावशेवाडी, ता. जावली) हा अद्यापही फरार आहे. त्याच्या शोधासाठी मुंबई क्राईम ब्रँचसह मेढा पोलिसही जंगजंग पछाडत आहेत. मात्र, अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याच्या मोबाईल लोकेशनचा ठावठिकाणा मिळत नसल्याने पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, डिगेच्या घराची मेढा पोलिसांनी झाडाझडती घेतल्याचे वृत्त आहे.

सावरी येथील एमडी ड्रग्जच्या फॅक्टरीवर छापा टाकून 115 कोटींचे घबाड पोलिसांनी शनिवारी जप्त केले होते. त्यामध्ये 50 कोटींचे साडेसात किलोचे एमडी ड्रग्ज, 38 किलो लिक्विड, अमली पदार्थ निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल व साहित्याचाही समावेश होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांना ओंकार डिगे हवा आहे. वास्तविक कारवाई झाली त्यादिवशी शनिवारी ओंकार डिगेला पोलिसांनी घटनास्थळी आणले होते. त्याच्याकडे कसून चौकशीही करण्यात आली होती. मात्र, त्याचदिवशी दुपारी ओंकार डिगेला सोडून देण्यात आले होते. त्यावेळेपासून डिगे गायब आहे.

रविवारी मात्र मुंबई पोलिसांसह मेढा पोलिसही त्याला पुन्हा शोधू लागले. सावरीतील जागा गोविंद बाबाजी शिंदकर यांनी ओंकार डिगे याच्यामार्फत संशयित सद्दाम नजर अब्बास सय्यद यांना भाडेतत्वावर दिली होती. तेथे ड्रग्ज तयार झाल्यानंतर मुंबईसह अन्य शहरात विक्रीसाठी पाठवले जात होते. एमडी ड्रग्ज विक्री करणारी ही आंतरराज्य टोळी असल्याचा पोलिसांचा कयास आहे. त्यामुळे या प्रकरणात ओंकार डिगे याचा महत्वपूर्ण रोल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. डिगेच्या शोधासाठी पोलिस जंगजंग पछाडत आहेत.

ओंकार डिगे रविवारी चारचाकीतून बामणोली परिसरात फिरत असताना पाहिल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले. त्यानंतर मात्र तो या परिसरात दिसलाच नाही. सोमवारी मेढा पोलिसांनी या परिसरात चौकशी केली. त्याच्या मित्रांकडे व नातेवाईकांकडे माहिती घेतली. डिगेच्या पावशेवाडी येथील घरीही झडती घेतल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. डिगे आता पोलिसांना हवा असला तरी सापडत नाही. तो नक्की आहे तरी कुठे?, त्याला कुणी लपवले तर नाही ना? अशा अनेक प्रश्नांची उकल पोलिसांना करावी लागणार आहे.

पोलिस वाहनात तोंड झाकून बसवलेला डिगे गेला तरी कुठे?

ओंकार डिगे याने सावरीतील संबंधित ठिकाणी काही महिन्यांपूर्वी असेच उद्योग केल्याची चर्चा आता सावरी आणि मावशी गावातील ग्रामस्थ बोलू लागले आहेत. शनिवारी मुंबई पोलिसांनी कारवाई केली, तेव्हा ओंकार डिगेला सकाळी तोंड झाकून पोलिसांच्या वाहनात बसवल्याचे हे ग्रामस्थ सांगत आहेत. मात्र, दुपारनंतर डिगेला सोडून दिले होते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ड्रग्ज तयार करणाऱ्या संशयितांची सर्व व्यवस्था डिगेच बघत होता. संशयितांना याठिकाणी ओंकार डिगेनेच आणले होते. संशयितांची राहण्याची व खाण्या-पिण्याची सोय त्यानेच केली होती, असे स्थानिक सांगत आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जावे, अशी आग्रही मागणी कोयना भाग 105 गावांतील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news