

Vishwas Patil Controversy :
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी नुकतीच साताऱ्याला भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या जातीयवादाच्या आरोपांना स्पष्टपणे फेटाळून लावले. त्यांनी नमूद केले की, त्यांच्यावर द्वेष आणि मत्सरापोटी 'राळ' उडवली जात आहे.
साताऱ्यात आगमन झाल्यानंतर पाटील यांनी 'पुढारी' वृत्तपत्राचे पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. पुढारीच्या वतीने निवासी संपादक हरीश पाटणे आणि विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.
पत्रकारांशी बोलताना विश्वास पाटील यांनी इतक्या कादंबऱ्या लिहिल्यानंतरही आपल्यावर जातीयवादाचा आरोप होत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देण्याची गरज नसल्याचे सांगितले. त्यांच्या मते, 'आरोप' आणि 'राळ' या शब्दांमध्ये फरक आहे. आरोपांसाठी नोटीस दिली जाते, तर त्यांच्यावर उडवलेली ही केवळ राळ होती, ज्यात त्यांची घरची आणि बाहेरची सगळी माणसे सहभागी होती. द्वेष आणि मत्सर या रोगावर जगात औषध नाही.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साताऱ्यात येऊन माझे मन भरून आले आहे, अशी भावना विश्वास पाटील यांनी व्यक्त केली. 'सातारा ही सुसंस्कृत नगरी आहे, कर्तबगारीची पेठ आहे. मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून भारतातल्या अन्य कुठल्याही शहरात होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्ष केले असते, त्यापेक्षा कितीतरी जास्त आनंद मला साताऱ्यात होणाऱ्या संमेलनाचा अध्यक्ष केल्याबद्दल होतो आहे.' असं वक्तव्य त्यांनी केलं.
दरम्यान, साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हावे अशी माझी काही फार मोठी महत्वाकांक्षा नव्हती किंवा त्यासाठी मी प्रयत्न केले नाहीत, असं देखील विश्वास पाटील म्हणाले, यावेळी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि अखिल भारतीय साहित्य संमेलन साताऱ्यात घेऊन येणारे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी हे उपस्थित होते.