

कोरेगाव : कोरेगाव शहरात सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न करणार्या दोन परप्रांतीय संशयितांना कोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. व्यापार्यांच्या सतर्कतेमुळे चोरीचा हा प्रयत्न फसला. या घटनेची नोंद कोरेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.
मंगल कुमार सियाराम कुमार आणि रणजित कुमार (रा. अयोध्या, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
शहरातील मेनरोडवरील भुतडा कॉम्प्लेक्समध्ये सुशील राजेंद्र घाडगे (रा. ल्हासुर्णे) यांचे सराफी दुकान आहे. रविवारी पहाटे संशयितांनी दुकानाची फरशी फोडून व शटरचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री आवाज येत असल्याने व्यापारी किशोर ओसवाल यांना चोरी होत असल्याचे निदर्शनास आले.
यानंतर त्यांनी याची पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच सपोनि प्रशांत हुले हे कर्मचार्यांसह घटनास्थळी पोहचले. यावेळी तिघांपैकी एक जण पोलिसांना सापडला तर दोघे पळून गेले. दोघांचा शोध सुरू असताना एकाला पाठलाग करून पकडले. संशयितांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.