

कराड : ज्येष्ठ मराठी साहित्यिक, सिद्धहस्त ललितलेखक, कवी आणि कराड येथे संपन्न झालेल्या ७६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीनिवास विनायक कुलकर्णी (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वावर शोककळा पसरली असून संवेदनशील लेखनशैली, निसर्गदृष्टी आणि समृद्ध साहित्यसंपदेने मराठी वाङ्मय समृद्ध करणारा एक मोठा साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला आहे.
सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे जन्मलेल्या श्रीनिवास कुलकर्णी यांचे प्राथमिक शिक्षण औदुंबर येथे, तर माध्यमिक शिक्षण अंकलखोप येथे झाले. पुढे सांगलीत अनाथ विद्यार्थी आश्रमात राहून त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. बालपणापासून लाभलेला निसर्गसौंदर्य, चित्रकलेचा वारसा आणि संस्कारक्षम वातावरण यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. याच अनुभवांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यकृतींमध्ये उमटत राहिले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ साइनबोर्ड पेंटिंगचा व्यवसाय केला. त्यानंतर ओगले ग्लास वर्क्समध्ये नोकरी केली आणि पुढे मुंबईतील मौज प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून मराठी साहित्य क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली.
मराठी चौथीत शिकत असतानाच त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर 'बनातल्या उजेडात' या ललितलेखापासून त्यांच्या साहित्यप्रवासाला नवे वळण मिळाले. कराड येथे पार पडलेल्या ७६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत प्रभावी नेतृत्व केले होते. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले.
त्यांच्या निधनाने साहित्यविश्वाने एक अभ्यासू विचारवंत, संवेदनशील लेखक, निसर्गप्रेमी साहित्यिक आणि संस्कारक्षम व्यक्तिमत्त्व गमावले आहे, अशा शब्दात विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आर्किटेक्ट उदयन व आलोक ही दोन मुले, दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.