Valentine’s Day: ‘व्हॅलेंटाईन डे‌’ला आज प्रेमपाखरांचा उत्सव

अनेकजण घेणार प्रेमाच्या आणाभाका : गुलाब, चॉकलेटसह भेटवस्तूंना मागणी
Valentines day
Valentines dayFile
Published on
Updated on

सातारा : मागील आठवड्याभरापासून सुरु झालेल्या व्हॅलेंटाईन वीकचा फीव्हर सुरु आहे. मुख्य दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे प्रेमपाखरांचा उत्सव आज साजरा होणार आहे. तरुणाई व्हॅलेंटाईन डेसाठी सज्ज झाली असून अनेजण आज प्रेमाच्या आणाभाका घेणार आहे. या पार्श्वभूमीवर गुलाब, चॉकलेटसह भेटवस्तूंना मागणी वाढणार असून बाजारपेठेतील अर्थकारणाला चालना मिळणार आहे.

आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरणातून डे संस्कृती फोफावू लागली आहे. व्हॅलेंटाईन डे हे त्यापैकीच एक कडी आहे. तरुणाईसह व्हॅलेंटाईन डे हा जोडप्यांसाठी खूप खास असतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी या आठवड्यातील प्रत्येक दिवस तरुणाई खास दिवस म्हणून साजरा करत एकमेकांना भेटवस्तू देऊन, प्रेम व्यक्त करतात. याला वयाचे कोणतेच बंधन नाही. अगदी हळूवार वयातील प्रेमापासून ते विवाहीत जोडप्यांपर्यंत सर्वच आपल्या साथीदाराच्या सहवासातही हे प्रेमाचे दिवस साजरे करतात.

शनिवारी अन्‌‍ रविवार अशी जोडून शासकीय सुट्टी आल्याने अनेकांनी व्हॅलेंटाईनचे प्लॅनिंग केले असून खास दिवसाचे सेलीब्रेशनही संस्मरणीय ठिकाणी केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटनाला बहर येणार आहे. जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाणांवर पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. व्हॅलेंटाईन निमित्त गुलाब, चॉकलेट, केक, भेटवस्तूंना मागणी वाढणार असल्याने बाजारपेेठतील अर्थकारणाला चालना मिळणार आहे.

व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. मात्र प्रेमात त्याग, समर्पणाची भावना कमी होवून बदला, खूनापर्यंतचे विविध रंग चढू लागल्याचे अलीकडील काही घटनांमुळेसमोर आले आहे. व्हॅलेंटाईन डेला प्रेमाच्या आणाभाका घेवून भविष्यात मात्र प्रेम विनाशास कारण ठरत आहे. मग केवळ सेलीब्रेशनसाठी नुसत्या प्रेमाच्या आणाभाका काय कामाच्या? प्रेमाचे पावित्र्य राखण्यासाठी संस्कारयुक्त कृतीची जोड देण्याची गरज निर्माण झाली आहे.

सध्या सोशल मीडियाचा वापर वाढला असून त्यातून अनेकजण प्रेमात पडतात. एकमेकांना भेटण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. परंतू प्रत्यक्षात जेव्हा हे प्रेमवीर भेटतात तेव्हाचे वास्तव काही वेगळेच असते. बऱ्याचदा समोरुन प्रेमाच्या आणाभाका देणारी व्यक्ती ती ऐवजी तो असते, कधी विवाहित असते, वयाचे अंतर अशा बऱ्याच गोष्टींमुळे भ्रमनिरास होतो. त्यामुळे अभासी प्रेमातील धोके लक्षात घेवून वास्तवाचे भान राखत डोळसपणे प्रेमात पडणे केव्हाही चांगले. व्हॅलेंटाईन डेला प्रेमाची कबुली दिली जाणार असली तरी समोरुन नकार आला तर तो पचवायची हिंमतही ठेवावी लागणार आहे.

लेट पण थेट ...

यावर्षी व्हॅलेंटाईन विकवर निवडणुकीचे सावट होते. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात रोझ डे ने झाली असली, तरी त्या दिवशी मतदान होते. निवडणूक, प्रचार, मतदान अन्‌‍ निकालाचा विजयोत्सव प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर तरुणाई आघाडीवर होती. कुठे विजयाचा जल्लोष तर कुठे पराभवाची सल यामध्ये प्रेमाचा गवगवा झाकोळला गेला होता. त्यामुळे रोज डे, प्रपोज डे साजराच झाला नाही. त्याची कसर आता व्हॅलेंटाईन डेला लेट पण थेट होणार असल्याची चर्चा मैत्री कट्ट्यांवर रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news