सातारा : वर्धनगडावरील अनधिकृत बांधकाम वनविभागाने पाडले

सातारा : वर्धनगडावरील अनधिकृत बांधकाम वनविभागाने पाडले

खटाव; पुढारी वृत्तसेवा :  खटाव तालुक्यातील किल्ले वर्धनगडावर राखीव वनक्षेत्रावर केलेले अनधिकृत बांधकाम मंगळवारी सकाळी हटवण्यात आले. कमालीची गुप्तता पाळत वन विभागाने ही कारवाई केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

किल्ले वर्धनगडावर असलेल्या वनविभागाच्या राखीव क्षेत्रात करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटवण्यात यावे, अशी मागणी मनसेचे पदाधिकारी युवराज पवार यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. त्यानुसार मंगळवारी पहाटे पोलिसांच्या बंदोबस्तात वनविभागाच्या अधिकार्‍यांनी अनधिकृत बांधकाम हटवण्याची कारवाई सुरु केली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गडावर जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. सूर्योदय होताच पावणेसात वाजता कारवाई सुरु केली. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत रेकॉर्डवर नसलेले अनधिकृत बांधकाम हटवण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली.

मध्यरात्री तयारी आणि सूर्योदय होताच कारवाई

किल्ले वर्धनगडावरील अनधिकृत बांधकाम हटवण्याची तयारी मध्यरात्रीपासूनच करण्यात आली होती. पहाटेपासूनच गडावर जाणार्‍या सर्व रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन अधिकारी, 32 कर्मचारी, दोन स्ट्रायकिंग फोर्स तुकड्या आणि वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी कारवाईवेळी उपस्थित होते. यावेळी गडावर भाविकांसह सर्वानाच प्रवेशबंदी केली होती. प्रसिद्धी माध्यमांनाही मज्जाव केला होता. मंगळवारी दिवसभर गडावर कुणालाही प्रवेश देण्यात आला नाही.

logo
Pudhari News
pudhari.news