

सातारा : सातारा पालिकेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक आल्याने विकासाची गती वाढणार आहे. निवडणुकीत सामाजिक कार्य व लोकसेवा करणाऱ्यांना उमेदवारी देण्यात आली. नवी प्रशासकीय इमारत तयार झाली असून नगरसेवकांची विकासाची जबाबदारीही वाढली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून साताऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नावीण्यपूर्ण योजना राबवणार, अशी ग्वाही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली.
सातारा पालिकेत नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, मुख्याधिकारी विनोद जळक उपस्थित होते.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, माझी राजकीय व सामाजिक कार्याची सुरुवात नगरपालिकेच्या सभागृहातून झाली. एप्रिलपर्यंत नवी प्रशासकीय इमारत उपलब्ध होणार आहे. सातारकरांच्या विकासासाठी खूप अपेक्षा आहेत. लोकभावनांचा विचार करून विकास साधला पाहिजे. निवडणुकीत उमेदवारी देताना पदे मर्यादित आणि इच्छुक फार होते. त्यामुळे आमच्यासमोर उमेदवारी देताना कुणाला संधी द्यायची, असा पेच निर्माण झाला. जवळचा-लांबचा असा भेद आम्ही केला नाही; पण आजपर्यंत ज्यांच्या हातून जादा सामाजिक कार्य घडले किंबहुना पदावर नसूनही ज्यांनी लोकसेवा केली हाच निकष उमेदवारी देताना लावला. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी मनात किंतु-परंतु ठेवू नये. आम्ही दोघेही कोणताही भेदभाव करत नाही.
मी नगरसेवक असताना संपूर्ण शहराचा फेरफटका मारायचो. नगरसेवकांनी वॉर्डपुरते मर्यादित राहू नये. स्वत:च्या वॉर्डमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत असताना आजूबाजूच्या वॉर्डमध्येही काही विकासाच्यादृष्टीने निदर्शनास आले तर आम्हाला सुचवले पाहिजे. विकासाचे मुद्दे सुचवले तर ते स्वीकारून मार्गी लावले जातील. नागरिकांनी टाकलेल्या विश्वासास तडा जावू देवू नका. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकासाच्या योजना हद्दवाढीसह संपूर्ण शहरात राबवण्यात कमी पडणार नाही. मते दिली नाहीत म्हणून नागरिकांशी दुजाभाव न करता कुटुंब म्हणून वॉर्डचा विकास करावा. नगरसेवक, नगरसेविका व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते मात्र पदे मर्यादित असल्यामुळे पर्याय नाही. ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे संधी दिली जाईल. वॉर्डमध्ये कार्यक्रम घेताना सर्वांना निमंत्रित करावे. साताऱ्यासाठी शक्य तेवढे आम्ही दोघांनी मिळून केले. यापुढेही जे जे करावे लागेल ते करणार आहे. हद्दवाढ भागाच्या विकासासाठी लागणारा निधी दोघांच्या प्रयत्नांतून उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
मुख्याधिकारी विनोद जळक म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून सातारा पालिकेचे कामकाज प्रशासन करत आहे. सातारा हे राज्यात वेगळे शहर आहे. पिण्याच्या पाण्यासाठी स्वत:चे धरण असलेली ही एकमेव पालिका आहे. नैसर्गिक विविधतेने समृध्द शहर आहे. नागरीकरणासाठी चांगले शहर असून त्यादृष्टीने विकसित करणे आवश्यक आहे. हद्दवाढीमुळे रस्त्यांची लांबी वाढली आहे. मुलभूत सुविधा उपलब्ध करून आवश्यक आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राखण्याचा प्रयत्न करणार आहे. साताऱ्याचे पालकत्व पार पडण्याची सर्वांची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक अविनाश कदम, मनोज शेंडे, ॲड. डी. जी. बनकर, जयेंद्र चव्हाण, रवींद्र ढोणे, जयवंत भोसले आदि उपस्थित होते.