सातारा : उदयनराजे अजितदादांना भेटणार
सातारा, पुढारी वृत्तसेवा : भाजप, शिवसेना (शिंदे गट) युती सरकारमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट सहभागी झाला आहे. या पार्श्वभूमीवर 'पुढारी'ने महाराष्ट्रातील दोन अँग्री यंग मॅन एकत्र येणार हे वृत्त प्रसिद्ध करून भविष्यातील संकेत दिले होते. उदयनराजेंनीही मागील सर्व मनभेद विसरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या त्यांची धावपळ सुरू असल्याने प्रत्यक्ष भेटूनही शुभेच्छा देणार असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांना सांगितले.
सातारा शहरास पाणीपुरवठा करणार्या कास धरणापासून शहरापर्यंत सुमारे 29 कि.मी. लांबीची नवीन जलवाहिनी, जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याची टाकी तसेच वीज निर्मिती केंद्राच्या कामाचे भूमिपूजन खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले असून ते उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना शुभेच्छा देणार का? असे यावेळी विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, त्यांचा माझा फोन झाला आहे. सध्या त्यांची धावपळ सुरू असून सर्व विषय मार्गी लावल्यानंतर आपण भेटून चर्चा करू असे सांगितले. त्यानुसार त्यांची भेट घेणार असून त्यांना शुभेच्छा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार आणि खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यातील मतभेद संपूर्ण राज्याने पाहिला आहे. मात्र, खा. उदयनराजेंनी ना. अजितदादांना दिलेल्या शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
गेल्याच आठवड्यात 'पुढारी'ने या संदर्भात 'महाराष्ट्राचे दोन अँग्री यंग मॅन येणार एकत्र' हे वृत्त प्रसिद्ध करून अजितदादा व उदयनराजे एकत्र येणार असल्याचे संकेत दिले होते. उदयनराजे यांनी एक प्रकारे या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महाराष्ट्रालाही या दोघांच्या एकत्र येण्याची उत्सुकता आहे.