

Satara Thoseghar road Traffic
सातारा : सातारा - ठोसेघर मार्गावर बोरणे गावानजीक सुरू असलेल्या नवीन पुलाच्या बांधकाम केलेल्या पुलावरच ट्रक रुतल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाले आहे. या मार्गावरून आज (दि. २४) दिवसभर एकेरी वाहतूक सुरू आहे.
साताऱ्याहून ठोसेघरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बोरणे गावानजीक पुलाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर टाकण्यात आलेल्या भरीवर पावसाचे पाणी साचून हा रस्ता निसरडा झाला आहे. यावरच विटांनी भरलेला ट्रक कलल्यामुळे या रस्त्यावरून धोकादायक वाहतूक सुरू आहे. या परिसरात पावसाची रिप रिप सुरू आहे. डोंगर दऱ्यातून माती दगड रस्त्यावरून वाहून येत आहेत. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात कायमस्वरूपी कर्मचारी नेमावेत, अशी मागणी पर्यटक तसेच परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.