महाराणी येसुबाईंची समाधी संरक्षित स्मारक

महाराणी येसुबाईंची समाधी संरक्षित स्मारक

खेड, पुढारी वृत्तसेवा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांच्या संगममाहुली येथील समाधीला राज्य शासनाने संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला आहे. याबाबत मुंबईत झालेल्या बैठकीत राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्राथमिक अधिसूचना जाहीर केली. दरम्यान, या निर्णयामुळे महाराणी येसुबाईंच्या समाधीचा विकास व संवर्धनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्वराज्याच्या कुलमुखत्यार येसुबाई यांचे हिंदवी स्वराज्य स्थापनेतील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्राणांतक्रमणानंतर मोगलांच्या कैदेत येसुबाई यांनी 29 वर्षे प्रदीर्घ कालावधी काढल्यानंतर 1729 मध्ये त्यांचे सातारा येथे आगमन झाले. अखेरपर्यंत त्यांचे वास्तव्य सातारा शहरातच होते. मृत्यूनंतर त्यांची समाधी संगममाहुली येथे बांधण्यात आली. माहुली येथील 46.45 चौरस मीटर संरक्षित क्षेत्राला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला असल्याची घोषणा ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

येसुबाई फाऊंडेशनचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, जिज्ञासा इतिहास संशोधन मंडळाचे संचालक नीलेश पंडित हे साडेतीन वर्षे समाधीचा शोध घेत होते. समाधीच्या शोधासाठी सरपंच प्रविण शिंदे, उपसरपंच अविनाश कोळपे, प्रकाश माने, पांडुरंग नेवसे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली. गतवर्षी समाधीचे स्थान निश्चित झाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती माध्यमांना देऊन या समाधीला संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा, यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू केला. खा. उदयनराजे भोसले व आ.शिवेंद्रराजे भोसले यांनी यासाठी सहकार्य केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news