सातारा : पुढारी वृत्तसेवा
खिंडवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत चोरट्यांनी रात्री स्नॅक्स सेंटर फोडून फ्रीजसह लाखो रुपयांचे साहित्य चोरुन नेले. चोरट्यांचा सलग धुडगूस सुरू असल्याने विलासपूर, एमआयडीसी व खिंडवाडी येथील परिसर भेदरला आहे.याबाबत प्राथमिक माहिती अशी, मंगळवार दि. 20 ऑगस्ट रोजी रात्री स्नॅक्स सेंटर अज्ञातांनी फोडल्याची घटना बुधवारी सकाळी समोर आली.
गजानन कुडाळकर यांच्या मालकीचे ते स्नॅक्स सेंटर आहे. चोरीची घटना समोर आल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी ठसे तज्ञ, श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली. दुपारपर्यंत पंचनामा झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. चोरट्यांनी स्नॅक्स सेंटरमधील फ्रीजसह इतर साहित्य असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेले. गेली पाच दिवस विलासपूर, एमआयडीसी येथे घरफोड्या, लुटमारीच्या घटना घडत आहेत. नागरिकांनी गस्त सुरु असताना एका चोरट्याला तांगडून पकडण्यातही आले. दुसरीकडे लुटमार करणारी टोळीही शहर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच पकडली. यामुळे चोर्या-मार्या थांबतील अशी अपेक्षा होती. मात्र सातारा शहरालगत विलासपूर, एमआयडीसीचे लोन आता खिंडवाडीपर्यंत गेल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होवू लागली आहे.
खिंडवाडी येथील चोरीची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यासाठी तक्रारदाराची अक्षरश: परवड केली. सकाळी चोरीची घटना समोर आल्यानंतर तक्रारदारांनी घटनास्थळी पोलिसांना प्राथमिक सर्व माहिती दिली. पोलिसांनी दुपारी तक्रारदार यांना पोवई नाक्यावर येण्यास सांगितले. पोवई नाक्यावरुन पुन्हा एमआयडीसी चौकीत व त्यानंतर पुन्हा शहर पोलिस ठाण्यात तक्रारदार यांना येण्यास सांगितले. चोरीमुळे तक्रारदाराचे मानसिक खच्चीकरण झाले असताना पोलिसांनी अशी पळवापळवी केल्याने त्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.