सातारा : प्रतिनिधी
ठाणे आयुक्तालयामध्ये पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे व मूळचे साताऱ्याचे असलेले अनिल वाघमारे यांच्या घरी मंगळवारी पहाटे संतोष मनोहर पवार (रा.संगमनगर) या युवकाने वृद्ध वडीलांचे पैसे चोरत आणखी पैसे मागण्याचा प्रकार घडला असल्याची घटना समोर आली आहे. याबाबत स्वत: पोलिस वाघमारे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, पोलिस अधिकार्याच्या घरी आई- वडीलांच्याबाबतीत ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिस अनिल वाघमारे हे ठाणे आयुक्तालयामध्ये २०१२ पासून कार्यरत आहेत. ते मूळचे वनवासवाडी, सातारा येथील आहेत. ७ ते २१ फेब्रुवारी रोजीपर्यंत सुट्टी काढून ते सातार्यात आले आहेत. वाघमारे यांचे वनवासवाडी व संगमनगर येथे घर आहे. वनवासवाडी येथील घरात त्यांचे वडील गोपाळराम व आई हे राहत असून वृद्ध आहेत.
संतोष पवार हा केबल व्यवसायिक असून तो सुरुवातीला अनिल वाघमारे यांच्या आई- वडिलांची इतर कामे असतील तर तो करत होता. मात्र त्याला दारुचे व्यसन असल्याने त्याला इतर कामे सांगणे बंद केले होते.
१९ रोजी अनिल वाघमारे हे संगमनगर येथील घरात होते. त्यादिवशी आई वडीलांसोबत वाघमारे यांचे भाऊ होते. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास वडील गोपाळराम उठले होते. बाहेरच्या खोलीत ते आले असता त्याठिकाणी संतोष पवार हा आला होता. गोपाळराम यांनी त्याला हटकले असता तो त्यांच्या पाकिटातील ५०० रुपये काढत होता. पैसे काढून त्याने खिशात ठेवले व आणखी पैशांची मागणी करु लागला. वादावादी झाल्याने गोपाळराम यांचा दुसरा मुलगाही झोपेतून उठला.
याबाबतची माहिती अनिल वाघमारे यांना दिल्यानंतर ते घरी आले व वडिलांकडून माहिती घेतली. त्यावेळी संशयित संतोष पवार हा वेळोवेळी केबल व्यतिरीक्त इतर पैशांची मागणी करत होता. त्याला दोन-वेळा ५००- १००० रुपये दिले असल्याचेही गोपाळराम यांनी मुलाला सांगितले. यामुळे स्वत: अनिल वाघमारे यांनी शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.