Raju Shetti | दर जाहीर झाल्यानंतरच कारखाने सुरू करा : राजू शेट्टी

कृष्णा कारखान्याकडून मागण्या संचालक मंडळापुढे मांडण्याची ग्वाही
Raju Shetti | दर जाहीर झाल्यानंतरच कारखाने सुरू करा : राजू शेट्टी
Published on: 
Updated on: 

रेठरे बुद्रुक : चालू गळीत हंगामातील उसाचा रास्त दर निश्चित करण्यासाठी केंद्र शासनाने एमएसपी जाहीर करावी. तसेच उसाला प्रतिटन किमान पाच हजार रुपये दर द्यावा. शासनाने दर जाहीर केल्याशिवाय ऊस गाळप सुरू करू नये; अन्यथा राज्यातील सर्व साखर कारखान्यांसमोर आंदोलन छेडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

शिवनगर (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर ऊसदर संदर्भात शेट्टी यांनी आंदोलन केले. यावेळी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, संचालक धोंडीराम जाधव, बाळासाहेब जगताप यांनी शेट्टी यांच्याशी कारखान्याच्या मेन गेटवर चर्चा केली. दरम्यान मागण्यांबाबत कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळाच्या बैठकीत सकारात्मक विचार करून त्या मांडल्या जातील, अशी ग्वाही सुतार यांनी राजू शेट्टी यांना यावेळी दिली. आपण योग्य प्रकारे प्रश्न सोडवाल असे सांगून शेट्टी यांनी विश्वास व्यक्त केला.

दुष्काळसदृश परिस्थिती आणि पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता शेतात उभ्या असलेल्या उसाचे गाळप होणेही आवश्यक आहे. त्यामुळे कारखान्याने गाळप सुरू करण्याबाबत निर्णय घेतला असल्याचे सुतार यांनी सांगितले. दरम्यान साखरेचे बाजारभाव वाढले असतानाही पुरेशा प्रमाणात साखर विक्रीस केंद्र शासनाने परवानगी न दिल्याने कारखाने आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा मुद्दा शेट्टी यांनी उपस्थित केला. कृष्णा कारखान्याशी आमचे कोणतेही भांडण नसून, केंद्र शासनाकडे आमची मागणी आहे. कारखान्याने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कराड तालुकाध्यक्ष देवानंद पाटील, बापूराव साळुंखे, प्रदीप पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कराड तालुका पोलिसांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील तसेच कारखान्याच्या सुरक्षा विभागाने चोख बंदोबस्त ठेवला. चर्चा आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन पार पडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news